----
मोलमजुरी करून आपल्या लहानशा झोपडीवजा घरात मुलगा, सून नातवासोबत राहणारे भारत नगरमधील बुधा लक्ष्मण गोतरणे (६५) यांचा ‘त्या’ दुर्घटनेत बळी गेला आणि या कुटुंबाचा मुख्य आधारस्तंभ कायमचा कोलमडला. नियतीने बुधा यांना कायमचे हिरावून नेले. त्या कटू प्रसंगाची व्यथा मांडताना त्यांचा मुलगा प्रकाश आणि पुतण्या रमेशच्या डोळ्यांत अश्रू तरळले. प्रकाशच्या भावना त्याच्याच शब्दांत... ‘आमचे बाबा ही आमची ताकद होती, त्यांनीच मला सेंटरिंग कामाचे धडे दिले. सुरुवातीपासून काबाडकष्ट करत आम्हा भावंडांना वाढवले. दोन्ही बहिणींसह माझेही लग्न लावून दिले. सगळे काही सुखाने सुरु असतानाच कोरोनाचा राक्षस आला आणि या राक्षसाने माणसे गिळंकृत करण्यास सुरुवात केली. बाबांनाही त्रास जाणवू लागल्याने त्यांना मागील महिन्यात झाकीर हुसेन रुग्णालयात भरती केले होते. तब्येत सुधारताना दिसत होती. दुर्घटनेच्या दोन दिवस आधीपासून बाबा ऑक्सिजनवर होते. बाबा सकाळी चांगले जेवले आणि दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास अचानकपणे ऑक्सिजन पुरवठा हळूहळू कमी होत गेला. मी आणि माझे चुलत बंधू सगळेच खाली धावून आलो, सर्वत्र पळापळ सुरू होती, कोण म्हणे ऑक्सिजनची टाकी फुटली तर कोण म्हणे टाकी लिक झाली. आम्ही डॉक्टरांना सांगितले, ‘बाबांचे प्राण वाचवा’. पण, सगळ्यांचा नाईलाज होत गेला. ऑक्सिजन पुरवठा थांबताच बाबांचा श्वासदेखील कायमचा थांबला आणि त्यांनी आमचा निरोप घेतला’. गोतरणे कुटुंबाचा आधार दुर्घटनेने हिरावला.
----
फोटो nsk वर बुधा गोतरणे नावाने