नाशिक : खरीप हंगाम पीक विमा रक्कम भरूनही विमा कंपनीच्या मनमनी कारभारामुळे शेतकरी लाभापासून वंचित असल्याने शेतकऱ्यांना भरपाई मिळावी या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य किसान सभेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारी (दि. १७) आंदोलन केले. जिल्हाधिकारी मांढरे यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
नांदगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना विमा कंपनीच्या कारभाराचा फटका बसला असून सातत्याने मागणी करूनही शेतकऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप करीत पुन्हा एकदा आंदोलन करण्यात आले. यापूर्वी देखील पीक विमा कंपनीच्या मनमानीविरुद्ध तहसिल व तालुका कृषी अधिकारी कार्यालय येथे आंदोलन करण्यात आले होते. मात्र अजूनही शेतकऱ्यांना न्याय मिळाला नसल्याने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.
निवेदनात म्हटले आहे की, नांदगाव तालुक्यात ३० हजार शेतकऱ्यांनी खरीप हंगाम पीक विमा रक्कम भरली होती. या हंगामात अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. त्यानुसार महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना हेक्टरी १० हजार रुपये नुकसान भरपाई दिली होती. तर दुसरीकडे विमा कंपनीने फक्त ६ हजार शेतकऱ्यांना तुटपुंजी भरपाई दिली होती.
याच मागणीसाठी पीक विमा कंपनीच्या मनमानीविरुद्ध तहसील व तालुका कृषी अधिकारी कार्यालय येथे आंदोलन करण्यात आले होते. मात्र अजूनही शेतकऱ्यांना पीक विमा कंपनीने नुकसान भरपाई दिलेली नाही. तरी आपण महसूल विभागाच्या पंचनाम्यानुसार पीक विमा कंपनीला शेतकऱ्यांनी भरलेल्या विमा रकमेनुसार भरपाई देणेबाबत आदेश देण्यात यावे, असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी जिल्हा संघटक कॉ. विजय दराडे, संतोष बेदाडे, संजय हेंबाडे, कॉ. भास्करराव शिंदे, श्रावण विंचू आदी उपस्थित होते.
170921\17nsk_37_17092021_13.jpg
किसानसभा निदर्शने