नाशिक तालुका पूर्व भागातील शेतकरी उन्हाळी कामात व्यस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2019 12:45 AM2019-04-25T00:45:40+5:302019-04-25T00:46:05+5:30
नाशिक तालुका पूर्व भागातील शेतकरी सध्या शेतीच्या उन्हाळी कामात व्यस्त आहे. ठिकठिकाणी उन्हाळ कांदा काढून चाळीत साठविणे, कोबी-फ्लॉवरची निंदणी व फवारणी, फुटवा बांधणी, भाजीपाल्याची काढणी आदी कामात येथील शेतकरी व्यस्त असल्याचे दिसत आहे.
एकलहरे : नाशिक तालुका पूर्व भागातील शेतकरी सध्या शेतीच्या उन्हाळी कामात व्यस्त आहे. ठिकठिकाणी उन्हाळ कांदा काढून चाळीत साठविणे, कोबी-फ्लॉवरची निंदणी व फवारणी, फुटवा बांधणी, भाजीपाल्याची काढणी आदी कामात येथील शेतकरी व्यस्त असल्याचे दिसत आहे.
डिसेंबर ते जानेवारी दरम्यान लागवड केलेला कांदा एप्रिल-मे दरम्यान काढला जातो. एकलहरे परिसरातील सामनगाव, चाडेगाव, कोटमगाव, जाखोरी, चांदगिरी, हिंगणवेढे, कालवी, पाडळी, लाखलगाव, ओढा, शिलापूर, एकलहरेगाव या परिसरातील काही शेतकऱ्यांचा उन्हाळी कांदा काढून झाला आहे, तर काही ठिकाणी अजूनही कांदा काढण्याचे काम सुरू आहे. ज्यांचा कांदा काढून झाला आहे त्यांनी ऊन, वारा व अवकाळी पावसापासून संंरक्षण करण्यासाठी कांद्यांच्या राशीवर पात पसरून त्यावर उसाचे पाचट व ताडपत्री टाकून झाकून ठेवले आहेत. काही ठिकाणी अजूनही उशिरा लावलेले कांदे मजुरांकडून भरून चाळीत नेऊन टाकले जातात. कांदे निवडून मजुरांकडून चाळीत साठवण्याची लगबग सुरू आहे. मजुरांची वानवा असल्याने ठेकेदारी पध्दतीने ही कामे केली जातात.
सध्या उन्हामुळे दिवसभर उकाडा जाणवतो. त्यातच आभाळात काळ्या ढगांची गर्दी लक्षात घेता, अवकाळी पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. अनेक ठिकाणी वारा व गारांसह अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतमालाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे लवकरात लवकर कांदा चाळीत साठवून ठेवण्याची लगबग सुरू आहे.
- रुंजा पाटील-जगताप, शेतकरी, सामनगाव