लोकमत न्यूज नेटवर्क
एकलहरेः नाशिक तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकरी सद्या खरीप हंगामाच्या तयारीला लागले असून, सर्वत्र पेरणीपूर्व कामांची लगबग सुरू आहे. गेल्या दोन दिवस पडणारा अवकाळी पाऊस व चक्रीवादळाने शेतकऱ्यांची दाणादाण उडाली असली तरी या पावसामुळे जमीन नांगरुन, वखरुन भुसभुशीत होण्यास हातभार लागला आहे.
खरीप हंगाम जून ते सप्टेंबर असतो. या हंगामात प्रामुख्याने बाजरी, ज्वारी, भात, तूर, मका, कापूस, मूग, भुईमूग, सोयाबीन आदी पिके येथील शेतकरी घेतात. सद्या सर्वत्र असलेल्या कोरोनाच्या साथीमुळे शेतीच्या कामांसाठी मजुर मिळेनासे झाल्याने शेतकरी कुटुंबातील लहानथोर सर्वच शेतात राबतांना दिसतात. पूर्व भागात द्राक्षबागांची एप्रिल छाटणी होऊन सबकेनची कामे आटोक्यात आली आहेत. काही ठिकाणी उन्हाळी भुईमूग बहरलेला दिसतो. विशेषतः सामनगाव, चाडेगाव, कोटमगाव, जाखोरी, मोहगाव, बाभळेश्वर, हिंगणवेढा, कालवी, गंगापाडळी, लाखलगाव, ओढा, शिलापूर, माडसांगवी, एकलहरेगाव, गंगावाडी या भागातील शेतकरी खरिपाच्या मुख्य पिकांसोबतच हंगामातील भाजीपाला पिकेही घेतात. त्यामध्ये मिरची, वांगी, टमाटे, भेंडी, गवार, कोबी, फ्लॉवर यासह घेवडा, चवळी, कांदा, दुधीभोपळा, कारली, दोडका, घोसाळी, पडवळ, काकडी या वेलवर्गीय भाजीपाल्याचीही लागवड करतात.
नाशिक तालुका पूर्व भागातील बहुतेक शेतकरी मोठ्या प्रमाणात द्राक्षाची लागवड करतात. सोनाका, सुधाकर, थॉमसन, शरदसिडलेस, एस.एस.एन. या प्रकारचे द्राक्षाचे वाण घेतले जातात. सद्या द्राक्षबागांची काही ठिकाणी छाटणी तर काही ठिकाणी विरळणी सुरू आहे. तालुक्याच्या पूर्व भागात उत्तरेला गोदावरी व दक्षिणेला दारणा या दोन नद्यांचे मुबलक पाणी बाराही महिने असल्याने या भागात उसाचे पीकही मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. एकूणच नाशिक तालुका पूर्व भागातील शेतकऱ्यांची पावसाळापूर्वीची शेतीची मशागत करून खरीप हंगामाची तयारी जोरदार सुरू झाली आहे.
कोट==
कारली, दोडका, दुधीभोपळा, भेंडी यांची लागवड बियाण्यांपासून टोचन पद्धतीने केली जाते. मिरची, वांगी यांची रोपे चार ते सहा आठवड्यात तयार होतात. टमाट्याची रोपे तीन ते चार आठवड्यात लागवडीसाठी तयार होतात. टमाटे, मिरची, वांगी, कोबी, फ्लॉवर यांची रोपे रोपवाटिकेतही तयार करून मिळतात.
-रामदास डुकरे पाटील, शेतकरी, एकलहरे
(फोटो २० एकलहरे)