नाशिक : वनहक्क कायद्याची अंमलबजावणी व संपूर्ण जिल्हा दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी बुधवारी किसान सभेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचा प्रशासनाने धसका घेतल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात व बाहेर प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. दुपारी बारा वाजता गोल्फ क्लब मैदानावरून आमदार जिवा पांडू गावित यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. जुना त्र्यंबक नाका, जिल्हा परिषद, शालिमार चौक मार्गे शिवाजीरोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ मोर्चा अडविण्यात येऊन तेथून शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. किसान सभेचा मोर्चा असल्याने त्याचा धसका पोलीस व जिल्हा प्रशासनाने घेतला. त्यामुळे गोल्फ क्लब मैदानापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जागोजागी सशस्त्र पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.या मोर्चात किसन गुजर, सावळीराम पवार, सुनील मालुसरे, इंद्रजित गावित, मोहन जाधव, रमेश चौधरी यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते.अशा आहेत मागण्यायंदा पाऊस कमी झाल्याने संपूर्ण जिल्ह्णात दुष्काळ जाहीर करून पिण्याच्या पाण्याचे नियोजन करावे. पश्चिम नदी जोड प्रकल्प रद्द करून नार-पार, दमण गंगेचे पाणी अडविण्यात यावे. तसेच वनहक्क कायद्यान्वये फेटाळलेले सर्व दावे मान्य करण्यात यावे, स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी करावी, दुष्काळग्रस्त भागातील शेतकºयांचे सर्व कर्ज माफ करण्यात यावे, शेतकºयांना हेक्टरी ५० हजार रुपये नुकसानभरपाई द्यावी, जुने रेशन कार्ड बदलून द्यावे, जिल्ह्णातील उपवन संरक्षक शिवबाला व श्रीमती बिवला यांची तत्काळ बदली करा आदी मागण्या करण्यात आल्या.
जिल्हा दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी किसान सभेचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2018 12:29 AM