शेतकऱ्यांचा आज जिल्ह्यात चक्का जाम शेतकरी, कामगार संघटनांचा सहभाग : दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला समर्थन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 01:05 AM2021-02-06T01:05:49+5:302021-02-06T01:06:13+5:30
नाशिक: दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ शनिवारी (दि.६) नाशिक जिल्ह्यातील विविध शेतकरी व कामगार संघटना चक्का जाम आंदोलन करणार आहेत.
नाशिक: दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ शनिवारी (दि.६) नाशिक जिल्ह्यातील विविध शेतकरी व कामगार संघटना चक्का जाम आंदोलन करणार आहेत.
दिल्लीतील आंदोलक शेतकऱ्यांनी शनिवारी (दि. ६) देशभरातील शेतकऱ्यांना चक्का जाम आंदोलनाची हाक दिली आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत नाशिक जिल्ह्यात किसान सभा व आयटकचे कार्यकर्ते ठिकठिकाणी आंदोलन करणार आहेत. नाशिक तालुक्यातील शेतकरी सिन्नर फाटा येथे सकाळी ११ वाजता बहुजन शेतकरी संघटना व किसान सभेचे पदाधिकारी व कार्यकर्ते रास्ता रोको करून चक्का जाम करणार आहेत. तर निफाड तालुक्यातील चांदोरी येथे क्रांतिवीर छावा सेना व किसान सभेसह अन्य शेतकरी व कामगार संघटना सकाळी ९ वाजेपासूनच चक्का जाम करणार आहेत. त्याचप्रमाणे चांदवड, नांदगाव व मनमाड येथेही शेतकरी व कामगार दिल्लीतील शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ सकाळी ११ वाजेपासून रास्ता रोको करून आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदविणार आहेत. जिल्ह्यात किसान सभा, माकप, भाकप यांच्यासह छावा क्रांतिवीर संघटना व समविचारी शेतकरी कामगार संघटना तालुका पातळीवर आंदोलन करून दिल्लीतील शेतकरी आंदोलनाचे समर्थन करणार आहेत.
केंद्र सरकार दिल्लीतील शेतकरी आंदोलन मोडून काढण्यासाठी अमानुषपणे दडपशाही करीत असल्याचा आरोप करीत आंदोलनात सहभागी होऊन जिल्ह्यात चक्का जाम आंदोलन करण्याचा निर्धार जिल्ह्यातील शेतकरी व कामगार संघटनांनी केला आहे.
इन्फो-
केंद्राकडून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न ; किसान सभेचा आरोप
सरकारने दिल्लीतील आंदोलनस्थळांवर प्रचंड पोलीस बळ तैनात केले असून आंदोलकांची रसद तोडण्यासाठी पाणी, वीज, अन्नपदार्थ यांचा पुरवठा बळाचा वापर करत तोडण्यात आला आहे. आंदोलन स्थळावरील सत्य जगाला कळू नये. यासाठी इंटरनेट बंद करण्यात आले आहे. शेकडो शेतकऱ्यांना अटक करण्यात आल्याचा आरोप संयुक्त किसान मोर्चा व अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय महासचिव अतुल कुमार अंजन, राज्य सरचिटणीस नामदेव गावडे, राज्य सचिव राजू देसले यांनी केला आहे.