लोहोणेर : कांदा लागवडीची लगबग लोहोणेर परिसरात सध्या मोठ्या प्रमाणावर सुरू असून, कांदा लागवडीसाठी पूर्व मशागत करून शेतकरी सज्ज झाला आहे.
कांदा रोप लागवडीसाठी रोजंदारीवर मजूर मिळणे दुरापास्त झाल्याने मक्तेदारीने ज्यादा मोबदला मिळत असल्याने मजूरवर्गही मक्तेदारीसाठी पुढे सरसावा आहे. लोहोणेर व लगतच्या गावातील शेतकऱ्यांचे पुढील आर्थिक गणित हे सर्वस्वी कांदा पिकावर अवलंबून असल्याने कांदा हेच मुख्य नगदी पीक म्हणून समजले जाते. त्यासाठी शेतकरीवर्ग रात्रीचा दिवस करीत असतो.यावर्षी कांदा लागवडीसाठी मजुरांनी आपला मोबदला वाढविला असून, एकरी तीन ते चार हजार रुपयांची वाढ झाली असल्याचे शेतकरीवर्ग सांगत आहे. स्थानिक पातळीवर मजुरांची कमतरता जाणवत असल्याने बाहेर गावाहून मजूर आणून शेतकरी आपली कांदा लागवड करतात. घरापासून ते शेतात मजूर आणण्यासाठी व त्यांना परत घरापर्यंत पोहोचविण्यासाठी स्वतंत्र वाहनांची व्यवस्था ही शेतकऱ्यांना करावी लागत असते. त्यामुळे वेगळा आर्थिक भारही शेतकऱ्यांना सहन करावा लागत असतो.कांदा लागवडपूर्व शेती तयार करण्यासाठी नांगरणी, वखरणी, वावर बांधणे, रोटर मारणे, लागवडी आधी बुरशीनाशकांचे मिश्रण वापरणे आदी मेहनत करून शेत कांदा लागवडीसाठी तयार केले जात असते. यासाठी शेतकऱ्यांना आधीच पैसे खर्च करावे लागतात. त्यानंतर लागवड व वेळोवेळी तणनाशक, शक्तिवर्धक फवारणी तसेच कीटकनाशके यांचाही आर्थिक भार शेतकरी सोसत आहे. (२१ लोहोणेर, १)