विक्रीस आणलेल्या शेतीमालाचे करायचे काय?सायखेडा : नाशिक बाजार समिती सुरु राहणार की बंद याबाबतचे दोन संदेश काही तासांच्या अंतराने आल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. बाजार समिती सुरु राहणार म्हणून तोडणी केलेल्या शेतीमालाची पॅकींगही करुनही ठेवली. त्यानंतर समिती बंद राहणार असल्याचा दुसरा संदेश आल्याने पॅकींग करुन ठेवलेल्या मालाचे आता करायचे काय असा पेच शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे.नाशिक कृषि उत्पन्न बाजार समिती उद्या सकाळपासून सुरु होणार असल्याचा समितीचा निर्णय दुपारी सोशल मीडियावर व्हायरल झाला. शेतात विक्रीसाठी परिवक्व झालेल्या शेतीमालाची तोडणी करून शेतकऱ्यांनी पहाटेच्या लिलावासाठी माल पॅकिंग केला आणि अचानक रात्री उशीरा सोशल मीडियावर जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांचा मार्केट बंद असल्याचा आदेश धडकला. अवघ्या काही तासात मार्केट चालू बंद असल्याचे दोनदा आलेले मॅसेज शेतकऱ्यांचे नुकसान करणारे ठरले आहेत. सकाळी मार्केट सुरु असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता. शेतकऱ्यांनी पहाटे विक्री करावयाचा माल शेतातून घाईने काढला, पॅकिंग केली व अचानक मार्केट बंद असल्यामुळे आता या मालाचे करायचे काय, कुठे विक्री करणार असा प्रश्न निर्माण झाला आहेअगोदरच शेतकरी पडलेले बाजार भाव आणि शेती मालासाठी येणारा खर्च यांची ताळमेळ बसत नसल्याने अडचणीत आले आहेत. त्यात प्रशासनाची दुट्टपी भूमिका नुकसान करणारी आहे. पदाधिकारी आणि प्रशासन यांच्यात समन्वय नसल्याने असा अचानक निर्णय मागे घ्यावा लागत असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे.-----------आज दुपारी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती सुरु असल्याचे बाजार समितीचे पत्र आले. बाजार समितीत चौकशी केली असता मार्केट सुरु असल्याचे सांगितले. त्यामुळे दहा क्विंटलच्या आसपास गाजर विक्रीसाठी काढले. मजूर नसल्याने घरातील माणसे उन्हात राबली आणि सायंकाळी अचानक जिल्हाधिकारी मांढरे यांचा आदेश आला की बाजार समिती बंद आहे. त्यामुळे शेतातून काढणी केलेल्या गाजराचे काय करावे व कुठे विक्री करावी असा प्रश्न निर्माण झाला आहे.- निखिल डेर्ले, शेतकरी, शिंगवे
बाजार समितीचा निर्णय बदलल्याने शेतकरी अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 2:55 PM