नाशिक-पुणे या हायस्पीड रेल्वेमार्गाकरिता भूसंपादन विभागाकडून नानेगाव, संसरी, बेलतगव्हाण गावातील शेतकऱ्यांना जागा मोजणीबाबत गेल्या आठवड्यात नोटिसा देण्यात आल्या होत्या. ८ ते १२ जूनदरम्यान जागा मोजणी केली जाणार असल्याने तिन्ही गावांतील शेतकऱ्यांनी त्यास विरोध दर्शविल्याने रेल्वेमार्गाबाबत अनिश्चितता होती. बुधवारी (दि. ९) संसरीत सकाळी खासदार हेमंत गोडसे, महारेलचे बांधकाम विभागाचे सचिन कुलकर्णी यांच्यासह ग्रामस्थांची मारुती मंदिरात बैठक होऊन नियोजित रेल्वे मार्गामुळे संसरी गावाचे मोठे नुकसान होणार आसल्याची वस्तुस्थिती शेतकऱ्यांनी मांडली.
नाशिक-मुंबई रेल्वे लाइनच्या तिसऱ्या व चौथ्या लाइनकरिता पन्नास फुटापेक्षा जास्त जागेचे संपादन होत असल्याने पुन्हा गावाच्या दुसऱ्या बाजूने रेल्वे मार्ग गेला तर अनेक जणांना बागायत क्षेत्रापासून भूमिहीन व्हावे लागणार असल्याचे सांगण्यात आले. देवळाली कॅम्प रेल्वे स्टेशनमार्गे नवीन मार्ग अधिग्रहित केला तर सरकारी जमिनीवर प्रकल्प उभा राहू शकतो, अशी सूचना शेतकरी आनंद गोडसे, विजय गोडसे, सरपंच विनोद गोडसे, प्रशांत कोकणे, शेखर गोडसे, संजय गोडसे, अनिल गोडसे, अजय गोडसे, विष्णू गोडसे, सुरेश गोडसे, बाळू गोडसे आदींनी मांडली. अशाच प्रकारची बैठक नानेगावी तळेबाबा मंदिरात बैठक होऊन नानेगाव ग्रामस्थांनी प्रकल्पाला विरोध दर्शविला. यावेळी महारेलचे कुलकर्णी यांनी प्रकल्पाबाबत शेतकऱ्यांना माहिती देऊन त्यांच्या अडीअडचणी ऐकून घेतल्या. ग्रामस्थांनी महारेलच्या अधिकाऱ्यांसमोर दहा प्रमुख मागण्या मांडल्या. त्यात प्रामुख्याने नाशिक-पुणे रेल्वेसाठी स्थानकाला मंजुरी द्यावी, संपादित जमिनीव्यतिरिक्तची जागाही संपादित करावी आदी मागण्या करण्यात आल्या. खासदार गोडसे यांनी नाशिक-पुणे रेल्वेकरिता मोजणी करण्यास अनुमती दिली. यावेळी सुखदेव आडके, कचरू रोकडे, अशोक आडके, सुरेश शिंदे, विलास आडके, भगवान आडके, विजय आडके, काळू आडके, कैलास आडके पाटील, संदीप रोकडे, महारेलचे आर. एम. वाघ, विपुल पवार आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. अशीच बैठक बेलतगव्हाण येथेही घेण्यात येऊन शेतकऱ्यांनी शंभर टक्के नुकसान भरपाईची मागणी केली.
(फोटो ०९ रेल्वे) नानेगाव येथे शेतकऱ्यांना प्रकल्पाची माहिती देताना महारेलचे सचिन कुलकर्णी, खासदार हेमंत गोडसे, अशोक आडके, भगवान आडके, ज्ञानेश्वर शिंदे, काळू आडके आदी.