यंदा खरीप हंगामावर परिणाम होण्याची भीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 09:29 PM2021-05-23T21:29:18+5:302021-05-24T00:25:31+5:30
लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील सर्वच शेतकरीवर्ग खरीप हंगामाच्या तयारीला लागला आहे. पण कोरोनामुळे सर्व ठिकाणी शेतकामांच्या बाबतीत कामांची गती मंदावली असल्याने यंदा खरीप हंगामावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील सर्वच शेतकरीवर्ग खरीप हंगामाच्या तयारीला लागला आहे. पण कोरोनामुळे सर्व ठिकाणी शेतकामांच्या बाबतीत कामांची गती मंदावली असल्याने यंदा खरीप हंगामावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कोरोनामुळे शेतीव्यवसाय अडचणीत आल्यामुळे या हंगामातही बळीराजावर काळजीचे ढग आहेत. दोन हंगामापासून शेती कशी करावी या विवंचनेत शेतकरीवर्ग सापडला आहे. कारण कोरोनामुळे सर्वच ठिकाणी लॉकडाऊनची स्थिती, वाहतुकीचा अडथळा, बाजार समिती बंद, स्थानिक परिसरातील आठवडे बाजार बंद अशा अनेक संकटांमुळे आपल्या शेतातील मोठ्या कष्टाने व असंख्य स्वरूपाचे भांडवल खर्च करून पदरात काहीच पडले नाही. त्यामुळे उत्पन्न कमी व उत्पादन खर्च जास्त हे समीकरण निर्माण झाल्याने आता येणारा खरीप हंगाम कसा घ्यावा याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.
प्रत्येक हंगामात पिकविलेल्या शेतमालाला योग्य भाव मिळत नाही. जवळचे भांडवल संपल्यामुळे, शेतीसाठी घेतलेले कर्ज अजून फिटले नसताना आता खरीप हंगामासाठी भांडवल कसे उभे करायचे या आर्थिक संकटात सध्या दिंडोरी तालुक्यातील शेतकरीवर्ग सापडला आहे.
मागील हंगामापासून अवकाळी पाऊस, वातावरणातील बदल, अस्मानी - सुलतानी संकटे यामुळे शेतकरीवर्ग बेजार असताना त्यात भर पडली ती कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची. रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असताना रब्बी हंगामाचा शेवट कसा तरी केला; पण आता रुग्णसंख्येच्या वाढीमुळे खरीप हंगामाच्या कामासाठी सध्या मजूर टंचाई मोठ्या प्रमाणावर निर्माण झाल्याने खरीप हंगामातील कामांची गती मंदावली असल्याचे चित्र तालुक्यातील सर्वच भागात पहायला मिळत आहे. त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामातील उत्पादनांवर यांचा विपरीत परिणाम तर होणार नाही ना याची भीती शेतकरीवर्गाला वाटू लागली आहे.
खतांच्या वाढत्या किमतीचा फटका
सध्या सर्वत्र खरीप हंगामाची सुरुवात होत असताना रासायनिक खतांच्या किमती गगनाला भिडल्यामुळे शेतकरीवर्ग मेटाकुटीला आला आहे. अगोदरच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकरीवर्गाला खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच शासनाने जोरदार झटका दिल्याने आता खरीप हंगाम कसा घ्यावा या विवंचनेत तालुक्यातील बळीराजा सापडला आहे.
मागील खरीप हंगामात सोयाबीन पिकाने विक्रमी पातळी गाठली. साधारणपणे मागील वर्षी सोयाबीन सर्वसाधारण क्षेत्र होते ४५७१.०० व एकूण पेरणी क्षेत्र झाले ६६२३.८५ तर पेरणीची टक्केवारी होती १४४.९१ टक्के. तसेच बाकीच्या पिकांची आकडेवारी याप्रमाणे आहे.
पीक हेक्टरी क्षेत्र पेरणी क्षेत्र टक्केवारी
तृणधान्य १०२८५.६० ९६४१.५५ ९३-७४
कडधान्य ४३७५.८० २१९९.७५, ६१-८९
अन्नधान्य १४६६१.८० ११८४१.३० ८०-७७
गळीतधान्य ८०४५-०० १०६३०-६३ १३२.१४
एकूण खरीप क्षेत्र २२७०६.४० २२४७१.९३ ९८.९७
या तुलनेत यंदाची उत्पादन पीक टक्केवारी कोरोनामुळे पार होते की नाही यांची भीती शेतकरीवर्गाला वाटू लागली आहे.