उंच दरीवरून पडल्याने माजी रणजीपटू बुडाल्याची भीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2020 10:55 PM2020-09-01T22:55:50+5:302020-09-01T23:16:50+5:30
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रशांत वाघमारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, माजी रणजीपटू ट्रेकिंगसाठी इगतपुरी तालुक्यात आले होते.
घोटी (नाशिक)- माजी रणजी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक सेल्फी घेताना इगतपुरी तालुक्यातील मानस हॉटेल परिसरातील खोल दरीत पडल्याने खोल पाण्यात बुडाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मंगळवारी (१ सप्टेंबर) सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली असून अंंधार पडल्याने शोधकार्य होऊ शकलेले नाही. त्यामुळे बुधवारी सकाळी हे शोधकार्य होणार आहे.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रशांत वाघमारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते ट्रेकिंगसाठी इगतपुरी तालुक्यात आले होते. त्यांच्यासोबत काही मित्र होते. मानस हॉटेलच्या परिसरात ते आले असता एका खोल दरीच्या ठिकाणी ते सेल्फी काढत होते. त्याचवेळी त्यांचा तोल गेल्याने ते २५० फूट खोल दरीत कोसळले. याठिकाणी असलेल्या डोहात ते पडले. यासंदर्भात इगतपुरी तहसिल कार्यालय आणि पोलिसांना माहिती देण्यात आली आहे.
त्यानंतर इगतपुरीचे तहसिलदार परमेश्वर यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी संपर्क साधला. वाघमारे यांनी तातडीने बचाव पथकाशी संपर्क केला. मात्र, त्यावेळी अंधार झाला होता. त्यामुळे शोधकार्य झालेले नाही. त्यामुळे बुधवारी पहाटे हे शोधकार्य सुरू होणार असल्याचे वाघमारे यांनी सांगितले आहे.