कुसुमाग्रजांच्या काव्यातून उलगडल्या स्त्री भावना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2020 12:21 AM2020-03-16T00:21:57+5:302020-03-16T00:22:52+5:30
कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या काव्यातील स्त्री पात्रांच्या भावभावनांचा आविष्कार काव्यातून उलगडत गेला आणि उपस्थित रसिकांना कुसुमाग्रजांच्या त्या कविता जणू नवा अनुभव देऊन गेल्या. संस्कार भारतीच्या साहित्य कट्टातर्फे ‘सहेली’ या कार्यक्रमाला रसिकांनी दाद दिली.
नाशिक : कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या काव्यातील स्त्री पात्रांच्या भावभावनांचा आविष्कार काव्यातून उलगडत गेला आणि उपस्थित रसिकांना कुसुमाग्रजांच्या त्या कविता जणू नवा अनुभव देऊन गेल्या. संस्कार भारतीच्या साहित्य कट्टातर्फे ‘सहेली’ या कार्यक्रमाला रसिकांनी दाद दिली.
कविता जेव्हा एखाद्या सिद्धहस्त कवीच्या हातून उतरलेली असते, तेव्हा तिला अनेक कंगोरे असतात. प्रत्येकवेळी ते काव्य वाचताना नवीन अर्थ उलगडत जातो. हाच धागा पकडून विजय निपाणेकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘सहेली’ या कार्यक्रमात उपस्थित काव्यप्रेमींसमोर स्त्री प्रतिमा असलेल्या कुसुमाग्रजांच्या कवितांचे सादरीकरण करण्यात आले. त्यात रहस्य, रद्दी, भान, स्वस्त, पाणी, जोगीण, देणं, बंदीवान, वादळवेडी, अभिसारिका आणि थांब सहेली या कवितांचे वाचन करण्यात आले.
प्रारंभी संस्कारभारतीचे ध्येय गीत सादर झाले. त्यानंतर अनघा धोडपकर, नीता देशकर, प्राची कुलकर्णी, गौरी कोरडे यांनी काव्य सादरीकरण केले, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि काव्यांना जोडणारे शब्दांकन सोनाली तेलंग यांनी केले. प्रास्ताविक मेघना बेडेकर यांनी, तर आभार प्रशांत कुलकर्णी यांनी मानले. स्नेहा बेहरे, स्नेहल येवलेकर, रवींद्र बेडेकर आणि स्वाती राजाध्यक्ष यांच्यासह संस्कार भारतीचे पदाधिकारी उपस्थित होते.
कुसुमाग्रजांच्या काव्यातील स्त्री कधी प्रश्न उपस्थित करते, तर कधी स्वत:च त्या प्रश्नांवर तोडगा काढते. स्त्री जीवनातील वेगवेगळ्या नात्यांचे पदर उलगडून दाखवत जाणारे हे काव्यवाचन हा अनोखा अनुभव होता. व्यावहारिकतेत मातृत्वाचाही बळी देणारी स्त्री भानमधून, तर पाण्यासाठी जिवाला मुकणारी आणि मनाला चटका लावून जाणारी माता स्वस्तमधून उलगडते, असे विलक्षण अनुभव देणाऱ्या काव्यांना रसिकांनी दाद दिली.