खतांच्या किमती दोन दिवसांत कमी होतील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:16 AM2021-05-18T04:16:42+5:302021-05-18T04:16:42+5:30
ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर रासायनिक खतांच्या किमतीत भरमसाठ वाढ झाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. केंद्र सरकारने ...
ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर रासायनिक खतांच्या किमतीत भरमसाठ वाढ झाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. केंद्र सरकारने ही दरवाढ मागे घ्यावी, म्हणून गेल्या दोन दिवसांत अनेक शेतकरी आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी खासदार डॉ. सुभाष भामरे यांना संपर्क साधून नाराजीचा भावना व्यक्त केल्या होत्या. त्यामुळे भामरे यांनी सोमवारी दिल्ली येथे केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंग तोमर, केमिकल ॲन्ड फर्टिलायझर्स राज्यमंत्री मनसुक मांडविया आणि अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांची भेट घेतली. यावेळी कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी सांगितले की, स्वतः प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुद्धा खतांच्या दरवाढीबद्द्ल चिंता व्यक्त केली आहे, शेतकरीबांधवांना ही दरवाढ परवडणारी नसल्याने खतांच्या किंमती पूर्वीप्रमाणेच असाव्यात यासाठी त्वरित एक मंत्रिगटाची नियुक्ती करून खतांच्या किमती कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याचे आदेश मोदी यांनी दिले आहेत. त्यामुळे निश्चितच येत्या दोन ते तीन दिवसांत खतांच्या वाढलेल्या किमती कमी केल्या जातील आणि शेतकऱ्यांना वाजवी किमतीत रासायनिक खते मिळतील. खरीप हंगामाच्या आधी हा निर्णय घेतला जाईल, असे आश्वासित केले आहे.
त्यामुळे देशभरातील आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी काळजी करू नये, येत्या दोन ते तीन दिवसांत खतांच्या किमती कमी होतील, असा विश्वास खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी व्यक्त केला आहे.