लोकमत न्यूज नेटवर्कओझर टाउनशिप : चंपाषष्ठीनिमित्त ओझर येथील खंडेराव महाराजांच्या यात्रोत्सवास दि. २ डिसेंबर (चंपाषष्ठी) रोजी प्रारंभ होत आहे. ही यात्रा चार दिवस असते. या यात्रेला प्रारंभ झाल्यानंतर जिल्ह्यातील इतर ठिकाणच्या यात्रांना टप्प्याटप्प्याने सुरुवात होते.ओझर येथील मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील बाणगंगा नदीपुलाजवळ असलेल्या खंडेराव महाराज यांच्या यात्रेच्या पहिल्या दिवसाचे खास आकर्षण असते ते बारागाड्या ओढणे, पंचक्रोशीतील बारा वाड्यांतील बारागाड्या असतात. या सर्व बारागाड्या सवाद्य मिरवणुकीने यात्रेच्या ठिकाणी यात्रा मैदानात आणल्या जातात. खंडेराव महाराजांचा मानाचा घोडा असून, यात्रेच्या दिवशी मानाच्या घोड्यास दुपारी स्नान घालून त्याची पूजा केली जाते. याच दरम्यान देवाची पालखी मिरवणूक काढण्यात येते. या मिरवणुकीनंतर सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास यात्रेकरूंनी खचाखच भरलेल्या बारागाड्या एका रांगेत उभ्या करून एकमेकांना जोडण्यात येतात. मानाच्या घोड्याची व बारागाड्यांची विधिवत पूजा करून घोडा बारागाड्यांना जुंपला जातो तेव्हा लगेचच भाविकांकडून भंडाऱ्याची उधळण करीत ‘खंडेराव महाराज की जय, येळकोट येळकोट जय मल्हार’ अशा जयघोषाचा एकच निनाद होतो आणि बघता बघता घोडा बारागाड्या ओढून नेतो.बारागाड्या ओढण्यापूर्वी खंडेराव महाराजांच्या चांदीच्या मुकुटाची पालखी व मानाच्या घोड्याची सवाद्य मिरवणूक काढली जाते. यानंतर बाणगंगा नदीपात्रातील पाण्यात मानाच्या घोड्याचे पाय धुतले जातात. तेथे त्याची पूजा करून त्यास बारागाड्या ओढण्याच्या ठिकाणी यात्रा मैदानात आणले जाते. खंडेराव महाराजांच्या जयघोषाने परिसर दुमदुमून जातो. यावेळी वातावरण उत्साही व प्रसन्न असते. या दिवशी रात्रभर खंडेराव महाराज मंदिरासमोर वाघ्या मुरळीचे गोंधळाचे कार्यक्रम होतात.चांदीच्या मुकुटाच्या पालखीची मिरवणूक चार दिवस चालणाºया यात्रेत दुसºया दिवशी कुस्त्यांची विराट दंगल होते. कुस्त्यांच्या आखाड्यात महाराष्ट्रासह परप्रांतातील पहिलवान हजेरी लावतात व सहभाग घेतात. आखाड्यातील विजयी पहिलवानांना आकर्षक अशी रोख बक्षिसे दिली जातात. याच दिवशी खंडेराव महाराजांच्या चांदीच्या मुकुटाच्या पालखीची सवाद्य मिरवणूक काढण्यात येते. यात्रेनिमित्ताने मंदिरासह परिसरात केलेल्या विद्युत रोषणाईने परिसर झगमगून जातो.यात्रेसाठी आलेल्या सर्वसामान्य जनतेच्या करमणुकीसाठी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या लोककला पथकाचा यात्रेमध्ये दोन दिवस मुक्काम असतो तसेच रहाट पाळणे, इलेक्ट्रिक पाळणे, वन्यप्राण्यांचे प्रदर्शन, इलेक्ट्रिक रेल्वे, कार-मोटारसायकलचा मौत का कुआँ, जादूचे प्रयोग आदी करमणुकीचे कार्यक्र म असतात. त्याचप्रमाणे विविध खाद्यपदार्थांची दुकाने, हॉटेल्स, विविध प्रकारचे कपडे, खेळण्यांची दुकाने आदी दुकांनाचा समावेश असतो. यात्रेतील खाण्याच्या पदार्थांमधील खास आकर्षण असते ते म्हणजे जिलेबी, शेव, गोडीशेव.दि. २ ते ५ डिसेंबरपर्यंत चालणारी खंडेराव महाराजांची यात्रा शांततेत व उत्साहाच्या वातावरणात पार पाडावी असे आवाहन ओझर ग्रामपंचायत, जिल्हा परिषद सदस्य यतिन कदम, यात्रा कमिटी अध्यक्ष धनंजय पगार, उपाध्यक्ष युवराज शेळके, खजिनदार अशोकराव शेलार, पराग बोरसे, रामचंद्र कदम, उमेश देशमुख, धोंडीराम पगार, मर्चंट बँकेचे संचालक व मोंढा गाड्याचे मानकरी भारत पगार आदींसह पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी केले आहे.यात्रेसाठी येणाºया भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय तसेच यात्रा मैदानासह परिसरातील साफसफाई आदी गोष्टींकडे ग्रामपालिका लक्ष देते. ओझर येथील चार दिवसीय यात्रेच्या बंदोबस्तासाठी ओझर पोलिसांच्या मदतीला नाशिक ग्रामीण मुख्यालय, पिंपळगाव येथून जादा पोलीस कुमक बोलविण्यात येते.
चंपाषष्ठीनिमित्त यात्रोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2019 10:05 PM
ओझर टाउनशिप : चंपाषष्ठीनिमित्त ओझर येथील खंडेराव महाराजांच्या यात्रोत्सवास दि. २ डिसेंबर (चंपाषष्ठी) रोजी प्रारंभ होत आहे. ही यात्रा चार दिवस असते. या यात्रेला प्रारंभ झाल्यानंतर जिल्ह्यातील इतर ठिकाणच्या यात्रांना टप्प्याटप्प्याने सुरुवात होते.
ठळक मुद्देसोमवारपासून प्रारंभ : ओझरला बारागाड्या ओढण्यासह धार्मिक कार्यक्रम