मुळाणे येथे डोंगऱ्या देव उत्सवास सुरूवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 05:45 PM2020-12-29T17:45:52+5:302020-12-29T17:46:37+5:30
वरखेडा : उत्तर महाराष्ट्रातील सातपूडा व सह्याद्रीच्या पर्वत रांगेत, अतिदुर्गम भागात डोंगराच्या कुशित असलेल्या दिंडोरी तालुक्यातील मुळाणे येथे डोंग-या देव उत्सवात सुरूवात झाली असून पारंपारिक पद्धतीने विविध धार्मिक कार्यक्रम राबविण्यात येत आहेत.
वरखेडा : उत्तर महाराष्ट्रातील सातपूडा व सह्याद्रीच्या पर्वत रांगेत, अतिदुर्गम भागात डोंगराच्या कुशित असलेल्या दिंडोरी तालुक्यातील मुळाणे येथे डोंग-या देव उत्सवात सुरूवात झाली असून पारंपारिक पद्धतीने विविध धार्मिक कार्यक्रम राबविण्यात येत आहेत.
आदिवासींच्या जीवन संघर्षाच्या वाटचालीत परंपरागत चालत आलेल्या सामुदायिक उत्सवांना, व्रतांना जपण्याचे काम आदिवासी समाज आजही मनोभावे करीत आहे. डोंगऱ्यादेव हे आदिवासींचे अतिशय खडतर व तितकेच महत्वाचे व्रत मानले जाते. हे व्रत आदिवासींच्या विविध जमातीपैकी प्रामुख्याने कोकणा, महादेवकोळी, भिल्ल, वारली, पावरा, मावची आदी जमातीचे लोक मोठ्या प्रमाणात साजरा करतात. डोंगऱ्यादेव हे व्रत सामुदायिकरित्या पार पाडणारे नाशिक जिल्ह्यातील कळवण, पेठ, सुरगाणा, बागलाण, दिंडोरी, ईगतपूरी व त्रंबकेश्वर हे आदिवासी तालुके आहेत. सालाबादा प्रमाणे या वर्षीही सर्वत्र डोंगऱ्यादेव या व्रताच्या कार्यक्रमास नुकतीच सुरुवात झाली आहे.
महिनाभरापासून तयारी
प्रत्येक गावाच्या अगर विभागाच्या प्रथेनुसार आदिवासी डोंगऱ्यादेव हे व्रत तीन किंवा पाच वर्षांनी पाळतात. नियोजित वर्षाच्या मकशी म्हणजे मार्गशीर्ष महिन्याच्या अमावस्येला हे व्रत सुरु होते, आणि मार्गशीर्ष पौर्णिमेला त्याची सांगता होते. साधारणतः पंधरा दिवस पाळले जाणारे हे व्रत आदिवासी अलीकडे आठ ते दहा दिवसच पाळतात. ज्या गावात हे व्रत असते त्या गावातील आदिवासी या व्रताची महिनाभरापासून तयारी करतात.