भरधाव जीपची ‘बीट मार्शल’ला धडक; दोघे गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2019 07:00 PM2019-04-02T19:00:28+5:302019-04-02T19:02:40+5:30
पंचवटी : नाशिककडून गुजरातकडे द्राक्ष घेऊन जाणाऱ्या पिकअप जीपने चारचाकीला धडक देऊन चौफुलीवरील पोलीस चौकीजवळ उभ्या असलेल्या म्हसरूळ पोलीस ...
पंचवटी : नाशिककडून गुजरातकडे द्राक्ष घेऊन जाणाऱ्या पिकअप जीपने चारचाकीला धडक देऊन चौफुलीवरील पोलीस चौकीजवळ उभ्या असलेल्या म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या बीट मार्शलला उडविल्याची घटना सोमवारी (दि.१) रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास पेठरोडवर घडली. या घटनेत रात्री गस्तीवर असलेल्या म्हसरूळ पोलीस ठाण्याचे दोघे बीट मार्शल कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत तर अपघातानंतर वाहनचालक वाहन सोडून फरार झाला होता; मात्र त्यास दुपारी पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, म्हसरूळ पोलीस ठाण्याचे बीट मार्शल कर्मचारी नंदू जाधव व राजेश लोखंडे असे दोघेजण रात्रपाळीच्या गस्तीवर असताना पेठरोडवरील पोलीस चौकीशेजारी उभे होते. यावेळी पेठरोडने गुजरातकडे भरधाव द्राक्ष घेऊन जाणाऱ्या जीपने (एमएच १७, बीवाय ९०७०) मखमलाबादकडे जाणा-या चौफुलीवर मिनी टेम्पोला (एमएच १५, एफइ १३५३) धडक दिली. जीपचा वेग इतका होता की या धडकेनंतरही चालकाला वाहनावर नियंत्रण मिळविता आले नाही व जीप पोलीस चौकीजवळ उभ्या असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या अंगावर जाऊन आदळली. यामुळे दोन्ही पोलीस कर्मचारी दूरवर फेकले गेले. अपघात इतका भीषण होता की, लोखंडी बॅरिकेडदेखील तुटले तसेच सर्वत्र द्राक्षांचा खच पडलेला होता. अपघाताची माहिती मिळताच तत्काळ पोलीस घटनास्थळी पोहचले. जखमी पोलिसांना उपचारासाठी रु ग्णालयात दाखल करण्यात आले, तर अपघातात टेम्पोचालक गंभीर जखमी झाल्याचे समजते. अपघातातील जखमी जाधव व लोखंडे या दोघाही पोलीस कर्मचा-यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
---