नांदगाव : जमीन घोटाळा प्रकरणी नांदगाव तालुका चर्चेत राहिला आहे. शासनाकडून भूमिहिनांना वन जमिनी वाटप होतात पण चांदोरा येथील तलाठ्याकडून भूमिहीन असल्याचे बोगस दाखले सादर करुन ग्रामसेवक, कृषी सहायक यांच्या संगनमताने जमिनी लाटल्याची तक्रार करण्यात आली असून या प्रकरणाची चौकशी करुन दोषींवर कारवाईची मागणी चांदोरा सोसायटीचे चेअरमन प्रकाश घोटेकर यांनी केली आहे. या प्रकरणाची तक्रार येवला प्रांत व उपवन संरक्षक यांच्याकडे करण्यात आली आहे.घोटेकर यांनी तक्रारीत म्हटले आहे, तालुक्यातील चांदोरा येथील तलाठ्याकडून भूमिहीन असल्याचा बोगस दाखला सादर करुन ग्रामसेवक, कृषी सहायक यांच्या संगनमताने फेरफार नोंदी करुन १२ व्यक्तींना दुसऱ्यांदा वनजमिनीचा लाभ मिळाल्याची घटना तालुक्यातील चांदोरा येथे घडली. तलाठी यांनी नोंद नं १३९५,१४००,१४०४ या नंबरने फेरफार करुन ७/१२ उताऱ्यावर इतर हक्कात नोंदी केल्या आहेत. विशेष म्हणजे तलाठ्याने दि ७/१२/२० रोजी नोंद करताच मंडळ अधिकाऱ्याने ८/१२/२० रोजी नोंद केली आहे.वनजमिनीसाठी नागरिक सरकारी दरबारी खेट्या मारतात.
परंतु ज्यांना वनजमीन मिळाली त्याच व्यक्तींना दुसऱ्या वनजमिनीचा लाभ मिळाला आहे. त्यामुळे वनजमिनीचे खरे लाभार्थी वंचित राहिले आहेत .निकष डावलून वनजमीन वाटपाच्या तक्रारी येवला येथील प्रांत सोपान कासार व उपवनसंरक्षक पूर्व विभाग तुषार चव्हाण नाशिक यांच्याकडे केली.
त्या नुसार संबंधित अधिकाऱ्यांनी याबाबतची चौकशी करून आपल्या स्तरावर चौकशीचे आदेश तहसीलदार,व वनपरिक्षेत्र अधिकारी यांना देण्यात आले आहेत. यास चार महिने उलटून गेले तरी संबंधित यंत्रणा या प्रकरणाची चौकशी करुन कारवाई करीत नसल्याची तक्रार चांदोरा सोसायटीचे चेअरमन प्रकाश घोटेकर केली असून उपोषणाचा इशारा दिला आहे.