सिन्नर : नायलॉन मांजा वापरुन पतंग उडवून युवकाच्या गळ्यास गंभीर दुखापत केल्याप्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात पतंग उडविणा-या अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशा प्रकारे गुन्हा दाखल होण्याची जिल्ह्यातील ही पहिलीच घटना ठरावी.नाशिक-पुणे महामार्गावर गुरुवारी (दि.१३) सकाळी नायलॉन मांजा गळ्यात अडकून उमाकांत मधुकर नवले (३२) हा युवक गंभीर जखमी झाला होता. नायलॉन मांजाने गळ्याची रक्तवाहिनी व स्नायू तुटल्याने त्याच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करावी लागली होती. सुदैवाने श्वासनलिकेला इजा न झाल्याने मोठा अनर्थ टळला होता. त्यानंतर नगरपरिषदेच्या पथकाने शहरात मोहीम राबवून पतंग व मांजा विक्रेत्यांविरोधात मोहीम उघडली. मात्र त्यात त्यांना मांजा आढळून आला नव्हता.दरम्यान, घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी जखमी उमाकांत नवले या तरुणचा जबाब नोंदवून घेत अज्ञात पतंग उडविणा-याविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रामदास धुमाळ, राहुल निरगुडे अधिक तपास करीत आहेत.
पतंग उडविणा-याविरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 5:33 PM
सिन्नर : नायलॉन मांजामुळे युवक जखमी
ठळक मुद्देनगरपरिषदेच्या पथकाने शहरात मोहीम राबवून पतंग व मांजा विक्रेत्यांविरोधात मोहीम उघडली. मात्र त्यात त्यांना मांजा आढळून आला नव्हता.