शाळा भरो ना भरो, पहिल्या दिवशी पुस्तके मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2020 08:23 PM2020-06-06T20:23:08+5:302020-06-07T00:50:53+5:30
कोरोना विषाणू संसर्गामुळे १५ जूनला शाळा सुरू होतील की नाही हे अनिश्चित असले तरी विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी मोफत पाठयपुस्तके मिळणार आहेत.
पेठ : कोरोना विषाणू संसर्गामुळे १५ जूनला शाळा सुरू होतील की नाही हे अनिश्चित असले तरी विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी मोफत पाठयपुस्तके मिळणार आहेत.
समग्र शिक्षा अभियान अंतर्गत दरवर्षी सर्व व्यवस्थापनाच्या अनुदानादीत शाळेतील इयत्ता १ ली ते ८ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना
मोफत पाठयपुस्तके वाटप करण्यात येतात. या वर्षी कोरोनाचा संसर्ग आणी लॉकडाउन यामुळे पुस्तके प्राप्त होतात की नाही या विवंचनेत पालक व शिक्षक असतांना बालभारतीने मात्र लॉकडाउन पूर्वीच पुस्तकांची छपाई पूर्ण केल्याने पालकांची चिंता मिटली आहे. चौथ्या लॉकडाउनमध्ये काही प्रमाणात शिथिलता दिल्यानंतर जिल्हा स्तरावरून पुस्तके वाटप करण्यात आली. पेठ तालुक्याला पहिल्या फेरीत काही विषयांचे पुस्तके प्राप्त झाली असून शाळा सुरू होण्यापूर्वी
पुस्तके शाळेपर्यंत पोहच करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. गटशिक्षणाधिकारी सरोज जगताप, विषय प्रमुख वसंत खैरणार यांनी विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, गट साधन केंद्र कर्मचारी यांच्या मदतीने वाटपाचे नियोजन केले आहे.
नवीन शैक्षणिक वर्षात शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्याचे शिक्षण विभाग निर्गमित करेल. मात्र नियोजित वेळापत्रकाप्रमाणे मुलांच्या हातात शाळेच्या पहिल्या दिवशी पुस्तके पोहच करण्यासाठी शिक्षण विभागाचे प्रयत्न असून, कोरोनाबाबत योग्य खबरदारी घेऊन वरिष्ठांच्या आदेशानुसार पुस्तक वाटपाची कार्यवाही करण्यात येईल.
- सरोज जगताप, गटशिक्षणाधिकारी, पेठ
पहिल्या फेरीत प्राप्त पुस्तके
इयत्ता दुसरी - २६४२, इयत्ता ३री -२९५१, इयत्ता ४ थी - २६५३, इयत्ता ५ वी - २४१७, इयत्ता ६ वी - २४६७, इयत्ता ७ वी - २३५५.