लोकमत न्यूज नेटवर्कघोटी : इगतपुरी तालुक्यातील निसर्गावर कोण प्रेम करत नाही? जुन्या नव्या अनेक चित्रपटांचे चित्रीकरण या तालुक्यात झाले आहे. तालुक्यात चित्रनगरीची चर्चा सुरू असतानाच आता लॉकडाऊनच्या भयानक संकटानंतर निर्मात्यांना चित्रीकरणासाठी तालुक्यातील निसर्ग पुन्हा एकदा खुणावू लागला आहे. शासनाचा दादासाहेब फाळके पुरस्कार लाभलेल्या ‘बाजार’ चित्रपटाचे दिग्दर्शक योगेश भोसले यांच्या ‘वन फोर थ्री’ या मराठी चित्रपटाचे चित्रीकरण गेल्या पाच दिवसापासून कावनई परिसरात सुरू आहे.कोरोना महामारीमुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा फटका बॉलीवूडलाही बसला. परंतु, आता शासनाने काही अटी-शर्तींवर चित्रीकरणास परवानगी दिल्याने बॉलीवूड पुन्हा फार्मात आले आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता इगतपुरी तालुक्यातील निसर्गरम्य ठिकाणे चित्रीकरणासाठी खुणावू लागली आहेत. या चित्रपटात कावनई येथील श्रीक्षेत्र कपिलधारा तीर्थक्षेत्र ठिकाणी सिद्धेश्वर मंदिर दाखविण्यात आले. तर कावनई रस्ता वळणावर असलेल्या दर्गा येथे कव्वालीचे चित्रीकरण करण्यात आले . तसेच श्रीकपिलधारा पॉलिटेक्निक येथेही चित्रीकरण करण्यात आले. चित्रपटात नाशिक येथील अभिनेत्री शीतल आहिरराव यांच्यासह वृषभ शहा, सुरेश विश्वकर्मा,(सैराट चित्रपटातील आर्चीचे वडील ‘तात्या’) शशांक शिंदे या कलाकारांच्याही भूमिका आहेत. चित्रपटाच्या मुहूर्ताप्रसंगी श्री कपिलधारा पॉलिटेक्निकचे चेअरमन कुलदीप चौधरी, दीपक मंगे, दिग्दर्शक योगेश भोसले आदी उपस्थित होते.चित्रपट निर्मितीच्या माध्यमातून राज्यात अनेक ठिकाणी लोकेशन घेतले. अनेक लोकेशन नजरेत भरले मात्र इगतपुरी तालुक्यातील लोकेशन पाहता येथील निसर्गातून एक वेगळा आनंद व अनुभव घेता आला. इगतपुरी तालुक्यातील निसर्गरम्य वातावरण पाहिल्यानंतर महाबळेश्वर व पाचगनीचाही विसर पडावा असा येथील निसर्ग मनाला भावला.- योगेश भोसले, दिग्दर्शक