अखेर चालकांच्या तपासणीनंतर द्राक्षांच्या ट्रकला गुजरातमध्ये प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:13 AM2021-04-19T04:13:48+5:302021-04-19T04:13:48+5:30
नाशिक: वाहन चालकांच्या आरटीपीसीआर चाचणीचा नकारात्मक अहवाल नसल्याने, नाशिक जिल्ह्यातून गुजरात राज्याकडे भाजीपाला, तसेच द्राक्ष माल घेऊन जाणारी ...
नाशिक: वाहन चालकांच्या आरटीपीसीआर चाचणीचा नकारात्मक अहवाल नसल्याने, नाशिक जिल्ह्यातून गुजरात राज्याकडे भाजीपाला, तसेच द्राक्ष माल घेऊन जाणारी वाहने शनिवारी (दि. १७) सापुतारा चेक नाक्यावर गुजरात पोलिसांनी रोखून धरल्याने, रात्री उशिरापर्यंत वाहने चेक नाक्यावर थांबून होती. अखेर रात्री उशिरा विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ व खासदार भारती पवार यांनी स्थानिक व गुजरात प्रशासनाशी चर्चा केली. त्यानंतर चेक नाक्यावरील अधिकाऱ्यांनी थर्मल गनद्वारे चालकांची ताप तपासणी केल्यावर मालमोटारींना गुजरातमध्ये प्रवेश देण्यात आला.
कोरोनामुळे युरोपमध्ये लॉकडाऊन, तसेच देशांतर्गत निर्यातीतही अडचणी येत आहेत. शनिवारी (दि.१८) सायंकाळी नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी, वणी, ओझर, पिंपळगाव बसवंत, येथून गुजरात राज्याकडे द्राक्ष व भाजीपाला घेऊन जाणारी वाहने सापुतारा चेक नाक्यावर गुजरात पोलिसांनी आरटीपीसीआर चाचणी नकारात्मक अहवाल नसल्याच्या कारणावरून अडवून धरली होती. सुमारे तीन तासांपेक्षा अधिक काळ वाहने अडवून धरल्याने सापुतारा चेक नाक्यावर वाहनांच्या दूरपर्यंत लांबचलांब रांगा लागलेल्या होत्या. कोरोना चाचणी अहवाल आणा आणि मगच गाडी पुढे न्या, अशी भूमिका पोलिसांनी घेतल्याने, वाहन चालक, तसेच काही शेतकऱ्यांनी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ व खासदार भारती पवार यांना फोनद्वारे संपर्क करत गुजरातकडे वाहने सोडत नसल्याची तक्रार केली. त्यानंतर, झिरवाळ आणि पवार यांनी स्थानिक, तसेच गुजरात प्रशासनाशी चर्चा करत, यावर मार्ग काढण्याबाबत विनंती केली. त्यानंतर, गुजरात प्रशासनाने डॉक्टरांच्या मदतीने रात्री वाहन चालकांची थर्मल गनद्वारे तपासणी केल्यावर द्राक्ष व भाजीपाला वाहने सोडली.
कोट...
वाहन चालकांना आरटीपीसीआर चाचणी गरजेची
राज्य शासनाने जीवनावश्यक मालवाहतुकीला परवानगी असली, तरी मालवाहतूक करणाऱ्या ट्रान्सपोर्ट भाजीपाला वाहन चालकांनी परराज्यात जाण्यापूर्वी स्वतःची कोरोना चाचणी करून घेणे गरजेचे आहे. कोरोना चाचणीचा अहवाल नकारात्मक असेल, तर तसा अहवाल जवळ बाळगावा, जेणेकरून परराज्यात जातांना अडचण निर्माण होणार नाही.
- नरहरी झिरवाळ, उपाध्यक्ष विधानसभा