अखेर गंगापूर धरणातून पहिला विसर्ग सुरू, नदीकाठच्या लोकांना सातर्कतेच्या सूचना
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2020 08:55 PM2020-08-23T20:55:51+5:302020-08-23T20:56:26+5:30
गंगापूर धरणात पावसाचा जोर वाढल्यास कधीही मोठ्या प्रमाणात विसर्ग केला जाण्याची श्यक्यता लक्षता घेता गोदावरी नदीकाठच्या गावांना अतिसतर्कतेचा इशारा जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिला आहे.
नाशिक - आठवडाभरापासून गंगापूर धरण समूहाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या जोरदार ते मध्यम स्वरूपाच्या पावसामुळे रविवारी (दि.23) धरण जवळपास 94 टक्के भरले. त्यामुळे दुपारी एक वाजता या हंगामातील पहिला विसर्ग गोदावरीच्या पत्रात केला गेला. सुरुवातीला 500 क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला. त्यानंतर संध्याकाळपर्यंत विसर्ग 1100 क्यूसेकपर्यंत वाढविला गेला. विसर्ग कमी असल्याने व पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ओसारल्याने विसर्ग उशिरापर्यंत इतकाच कायम होता.
गंगापूर धरणात पावसाचा जोर वाढल्यास कधीही मोठ्या प्रमाणात विसर्ग केला जाण्याची श्यक्यता लक्षता घेता गोदावरी नदीकाठच्या गावांना अतिसतर्कतेचा इशारा जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिला आहे. शनिवारी विसर्गाची सूचना आगाऊ स्वरूपात प्रशासनाने दिली यामुळे नदीकाठावरील लोक, व्यावसायिक सतर्क झाले. . तसेच पूर परिस्थिती लक्षात घेता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला बचवकार्याच्या सर्व अत्यावश्यक साधनसामग्रीसह 'हाय अलर्ट'वर ठेवण्यात आले आहे. गंगापूर धरणातून विसर्ग सुरू झाल्याने निफाड तालुक्यातील सायखेडा, चांदोरी या गावांना पाण्याचा वेढा पडतो. तसेच शहारात सराफ बाजार, सरदार चौक, म्हसरूळ टेक, आसराची वेस, गाडगेमहाराज धर्मशाळा, नावदरवाजापर्यंत पाणी शिरते. मागील वर्षी 4 ऑगस्टरोजी थेट नरोशंकर मंदिराची घंटा पाण्यात बुडाल्याने महापूर आला होता. यंदा मात्र तशी स्थिती नाही. अतिवृष्टी पाणलोट क्षेत्रात नसल्याने पूरस्थिती ओढवण्याचा धोका सध्यातरी कमी आहे.
मात्र आपत्ती व्यवस्थापनातील अधिकारी आणि कर्मचारी सतर्क आहेत.
गंगापुर जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मागील आठ दिवसापासुन सतत पाऊस पडत असल्याने गंगापुर जलाशयामध्ये आज रविवारी 5 हजार 340 दलघफु इतका साठा झाला. धरण 94.21 टक्के भरल्याने विसर्ग सुरु केला गेला. पहाटेनंतर दिवसभर धरण समूहाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाला होता; मात्र मध्यरात्री जोर वाढल्यास पुन्हा विसर्गात वाढ होऊ शकते असं, जलसंपदा विभागाने स्पष्ट केले आहे.
जलाशय परिचालन सुचीनुसार निर्धारीत पाणीपातळी व पाणीसाठा राखण्याकरीता पाण्याचा विसर्ग करावा लागतो, असे सूत्रांनी सांगितले. गोदावरी नदीकाठालगतच्या वाड्या, वस्त्यांमध्ये रहाणाऱ्या नागरीकांनी सुरक्षेच्या कारणास्तव नदीपात्रात प्रवेश करु नये. आवश्यकता वाटल्यास सुरक्षित स्थळी स्थलांतरीत व्हावे. तसेच नदीकाठालगतची दुकाने, इंजिने, विद्युत मोटारी, पशुधन आदी तत्सम साहित्य यांचेही सुरक्षितठिकाणी स्थलांतर करावे, सुरक्षेची योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाने त्यांनी केले आहे.
-------
दुधस्थळी धबधबा खळाळला....
सोमेश्वर मंदिरा पासून जवळच असलेल्या गंगापूर शिवारातील नाशिककरांच्या पसंतीचा दुधस्थळी धबधबा या हंगामात पहिल्यांदाच रविवारी खळाळून वाहताना नजरेस पडला. कोरोनामुळे संपूर्ण क्षेत्र प्रतिबंधित घोषित करण्यात आला आहे. पर्यटकांना धबधब्याच्या परिसरामध्ये मज्जाव करण्यात आलेला आहे. त्यामुळे या परिसरामध्ये शुकशुकाट दिसून आला. एरवी धबधबा सुरु होताच पर्यटकांची या ठिकाणी गर्दी लोटते आणि फोटोसेशन साठी झुंबड उडते. मात्र रविवारी चित्र याविरुद्ध दिसून आले. नाशिककरांनी घरी थांबून माध्यमांच्या माध्यमातून धबधब्याचा आनंद घेणे पसंत केले.