अखेर बिबट्या अडकला पिंजऱ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2021 01:19 AM2021-01-07T01:19:56+5:302021-01-07T01:20:43+5:30
इगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव भटाटा शिवारातील गांगडवाडी येथे मंगळवारी (दि.५) दुपारी श्वानाच्या शिकारीसाठी धावताना बिबट्या एका झोपडीत अडकला होता. वनविभागाने प्रयत्नांची शिकस्त करत पाच तासांनंतर झोपडीच्या दरवाजाला पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद केले. मात्र अद्यापही बिबट्याची मादी या परिसरात असल्याची चर्चा असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण कायम आहे.
घोटी : इगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव भटाटा शिवारातील गांगडवाडी येथे मंगळवारी (दि.५) दुपारी श्वानाच्या शिकारीसाठी धावताना बिबट्या एका झोपडीत अडकला होता. वनविभागाने प्रयत्नांची शिकस्त करत पाच तासांनंतर झोपडीच्या दरवाजाला पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद केले. मात्र अद्यापही बिबट्याची मादी या परिसरात असल्याची चर्चा असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण कायम आहे.
वैतरणा मार्गावरील पिंपळगाव भटाटा हद्दीतील गांगडवाडी येथे मंगळवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास श्वानाला भक्ष्य करण्याच्या प्रयत्नात धावणारा बिबट्या थेट गोविंद हिंदोळे या इसमाच्या घरात शिरला होता. हिंदोळे यांनी यावेळी प्रसंगावधान दाखवत घराचा दरवाजा लावून घेतल्याने बिबट्या घरातच अडकून पडला होता. श्वान मात्र बिबट्याच्या तावडीतून सुटका करून घेण्यात यशस्वी झाला. दरम्यान, वनविभागाने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन राबविण्यास सुरुवात केली. वनविभागाला अनेक अडथळे आले. त्यात अंधार पडल्याने अडचणीत भर पडत गेली. दरम्यान, झोपडीच्या दरवाजालाच पिंजरा लावण्याचा निर्णय घेण्यात आला. याचवेळी झोपडीत फटाके फोडून बिबट्याला बाहेर काढण्याचे प्रयत्न होत होते. अखेर मंगळवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास बिबट्या पिंजऱ्यात
अडकला.
मादीही सोबत असण्याची शक्यता
पिंपळगाव भटाटा परिसरात घरात घुसलेल्या दीड ते दोन वर्षांच्या बिबट्याला जेरबंद करण्यात यश आले, परंतु परिसरात मादी असल्याची दाट शक्यता असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने या भागामध्ये लक्ष केंद्रित करून पुढील संकटांना रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात व आवश्यकता भासल्यास पिंजरा लावण्यात यावा, अशी मागणी स्थानिकांच्या वतीने केली जात आहे.