नाशिक - हिरवे हिरवे गार गालीचे, हरीत तृणांच्या मखमालीचे... बालकवींच्या या काव्य ओळी पावसाळ्यातच नव्हे तर नाशिक शहरात गोदापात्रातील पानवेली बघितल्यावरही सूचतात. गेल्या काही महिन्यांपासून गोदापात्रात मोठ्या प्रमाणावर पानवेली तयार झाल्या असून त्यामुळे पर्यावरण प्रेमींदेखील नाराज झाले आहेत. मात्र, आता महापालिका आणि स्मार्ट सिटीला जाग आली असून ट्रॅश स्कीमर मशिनने पानवेली काढण्याचे काम सुरू आहे.
गोदावरी हा नाशिककरांच्या दृष्टीने अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. सध्या गंगापूररोड परीसरात नदीपात्रात पुल बांधण्याचे काम सुरू असल्याने मातीचा बंधारा बांधून पाणी अडवण्यात आले आहे. त्यापुढील भागात नदीपात्रातून गाळ काढण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे पुढील भागात काही भागात कोरडे ठाक पात्र असून काही ठिकाणी पाणी साचून असल्याने तेथे पानवेली तयार झाल्या आहेत. त्याबाबत जोरदार टिका होऊ लागल्यानंतर अहिल्या देवी होळकर पुलाजवळ पानवेली काढण्याचे काम स्मार्ट सिटी आणि नाशिक महापालिकेने सुरू केले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात गोदावरी नदीतील पानवेली पूर्णपणे हटविले जाण्याची शक्यता आहे.