अखेर स्मार्ट सिटीचे सीईओ थविल यांची उचलबांगडी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 01:46 AM2021-07-03T01:46:29+5:302021-07-03T01:46:48+5:30
गेल्या पाच वर्षांपासून वादग्रस्त ठरलेले स्मार्ट सिटी कंपनीचे सीईओ प्रकाश थविल यांची अखेरीस राज्य शासनाने उचलबांगडी केली असून, त्यांच्याऐवजी सुमंत मोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
नाशिक : गेल्या पाच वर्षांपासून वादग्रस्त ठरलेले स्मार्ट सिटी कंपनीचे सीईओ प्रकाश थविल यांची अखेरीस राज्य शासनाने उचलबांगडी केली असून, त्यांच्याऐवजी सुमंत मोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. थविल यांच्यावर मनमानीबरोबरच अनेक कामांत अनियमितता तसेच गैरव्यवहाराचे आरोपदेखील संचालक आणि महापालिका पदाधिकाऱ्यांनी यापूर्वीच केले होते; मात्र, त्यासंदर्भात योग्य ते प्रकरणे सादर नसल्याने चौकशी कशी करणार असा प्रश्न अध्यक्षांनी उपस्थित केला.
दरम्यान, केंद्र शासनाकडून स्मार्ट सिटी मिशन गुंडाळण्याची तयारी सुरू असल्याची चर्चा असली तरी दोन वर्षे मुदतवाढ मिळणार असल्याचे सूताेवाच सीताराम कुंटे यांनी केले.
नाशिक स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक शुक्रवारी (दि.२) आयोजित करण्यात आली होती. बैठक कंपनी आणि थविल यांच्या कारभारामुळे वादग्रस्त ठरणार होती. कारण गेल्या २९ जून रोजी यासंदर्भात विशेष महासभेत थविल यांच्या मनमानी कारभारावर टीका करण्यात आली होती. स्मार्ट सिटीच्या चुकीच्या आणि गोंधळी कारभारामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याची टीका करतानाच कंपनीचे अध्यक्ष आणि राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्यावर टीका करण्यात आली होती. विशेषत: ते थविल यांना संरक्षण देत असल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर ३० जून रोजीच थविल यांची तडकाफडकी बदली करण्यात आली असली तरी त्याचे आदेश मात्र शुक्रवारी (दि.२) कुंटे यांच्या उपस्थितीत बैठक होत असतानाच मिळाले. थविल यांची महसूल व वने या मूळ खात्यात बदली करण्यात आली आहे.
कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत यासंदर्भात महापौर सतीश कुलकर्णी यांनी चर्चा छेडली; मात्र अध्यक्ष सीतराम कुंटे यांनी विषयपत्रिकेवरील प्रस्ताव संपल्यानंतर चर्चा करू, असे सांगितले. प्रत्यक्षात मात्र चर्चेची वेळ आली तेव्हा थविल यांची बदली झाल्याचे सांगितल्याने विषयच मिटला.
कोट...
प्रकाश थविल यांची बदली प्रशासकीय कारणाने करण्यात आली आहे. त्यांच्यावरील आरोपाच्या अनुषंगाने महासभेत चौकशीचा ठराव झाला असला तरी जेव्हा असा ठराव प्राप्त होईल, त्यावेळी त्यावर विचार करण्यात येईल.
- सीताराम कुंटे, अध्यक्ष, नाशिक स्मार्ट
इन्फो...
महापौरांच्या पाठपुराव्यामुळे पडली विकेट
स्मार्ट सिटी कंपनीचे सीईओ प्रकाश थविल यांच्यासंदर्भात महापौर सतीश कुलकर्णी यांनी सूत्रे स्वीकारल्यापासून पाठपुरावा सुरू केला होता. कुंटे यांना त्यांनी दोन पत्रेदेखील दिली होती. शुक्रवारी (दि. २) कंपनीच्या बैठकीच्या प्रारंभीच महापौर सतीश कुलकर्णी यांनी थविल यांच्या कारभारावर टीका करताना त्यांच्या केंद्र शासन बदनाम होत असल्याची त्यांनी टीका केली. गुरुमित बग्गा यांनीदेखील कोरडे ओढले.