अंबड व औद्योगिक परिसरात स्वच्छतेसाठी नियुक्त करण्यात आलेले घंटागाडीवरील कर्मचारी हे अंबड औद्योगिक परिसरातील उद्योजक व नागरिकांकडून स्वच्छतेसाठी पैशांची मागणी करून ब्लॅकमेल करीत असल्याची तक्रार भाजपा नगरसेवक राकेश दोंदे यांच्याकडे उद्योजक व नागरिकांनी केली. दोंदे यांनी याबाबतची दखल घेत बुधवारी सकाळी अचानक अंबड औद्योगिक वसाहतीतील मनपाच्या हजेरी शेड येथे पाहणी केली. सदर ठिकाणी २३ पैकी १० स्वच्छता कर्मचारी गैरहजर असल्याचे आढळून आले. यासंदर्भात दोंदे यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना जाब विचारला असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. तसेच यासंदर्भात वरिष्ठांनी सदर प्रकरणाची दखल घेऊन संबंधितावर त्वरित कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
कोट===
परिसराची नियमित स्वच्छता करण्यात येते. कोणताही कर्मचारी पैसे मागत नाही. जे कर्मचारी हजर राहत नाहीत, त्यांची गैरहजेरी लावली जाते. ठेकेदारांकडून घंटागाडी चालविली जाते. आम्ही फक्त त्यांच्यावर नियंत्रण ठेवतो.
- दीपक बोडके, स्वच्छता निरीक्षक, मनपा
(फोटो ०९ अंबड)- अंबड येथील हजेरी शेडमध्ये स्वच्छता कर्मचाऱ्यांना जाब विचारताना नगरसेवक राकेश दोंदे.