नूतन वर्षाच्या पहिल्याच दिवशी हजारो भाविक देवतांच्या चरणी लीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 12:57 AM2021-01-02T00:57:16+5:302021-01-02T00:57:39+5:30
नवीन वर्षाची सुरुवात देवदर्शनाने करण्याची परंपरा असून, तितक्याच भक्तिभावाने लोक भगवंत चरणी लीन होतात. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसाचे औचित्य साधून हजारो भाविकांनी नाशिकचे ग्रामदैवत कालिका माता, काळाराम मंदिर, तसेच साडेतीन शक्तिपीठांमधील स्वयंभू आद्यपीठ असलेली सप्तशृंगी माता, तसेच भगवान त्र्यंबकेश्वराचे मनोभावे दर्शन घेऊन मांगल्यासाठी साकडे घातले.
नाशिक : नवीन वर्षाची सुरुवात देवदर्शनाने करण्याची परंपरा असून, तितक्याच भक्तिभावाने लोक भगवंत चरणी लीन होतात. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसाचे औचित्य साधून हजारो भाविकांनी नाशिकचे ग्रामदैवत कालिका माता, काळाराम मंदिर, तसेच साडेतीन शक्तिपीठांमधील स्वयंभू आद्यपीठ असलेली सप्तशृंगी माता, तसेच भगवान त्र्यंबकेश्वराचे मनोभावे दर्शन घेऊन मांगल्यासाठी साकडे घातले.
देवाच्या चरणी माथा टेकविण्यासाठी धार्मिक महत्त्व असलेल्या नाशिक भूमीत परराज्यातील भाविक आवर्जून दाखल झाले आहेत. शुक्रवारी सकाळपासून गुजरात, मुंबईकडील भाविक नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. प्रभू रामचंद्राच्या वास्तव्याने पावन झालेली भूमी, त्यांचे वास्तव्य असलेली पंचवटी, तसेच रामकुंडाचे धार्मिक महत्त्व, शक्तिपीठ खान्देशची कुलस्वामिनी सप्तशृंगी माता यासह नाशिकमधील धार्मिकस्थळांवर भाविक नववर्षाच्या दर्शनासाठी गर्दी करीत आहेत. शहरातील ऐतिहासिक श्री काळाराम मंदिर, कपालेश्वर, सोमेश्वर, नवश्या गणपती, एकमुखी दत्त या धार्मिक स्थळांवरही भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाली आहे. पंचवटीतील सीता गुंफा, तसेच त्रिवेणी संगमावरही भाविकांनी भेट दिली. गोदाकाठी असलेली पुरातन मंदिरे, तसेच नाशिकपासून जवळच असलेल्या त्र्यंबकनगरीत भाविकांनी देवदर्शन घेत, नव्या वर्षाचा प्रारंभ केला.
वणीत भाविकांची रीघ
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या ७० ते ८० हजार भाविकांनी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सप्तशृंगी मातेच्या चरणी
नतमस्तक होऊन दर्शनाचा लाभ घेतला.
३१ डिसेंबरच्या दिवशी मंदिर २४ तास उघडल्यामुळे धुळे, जळगाव, नगर, नाशिक, मुंबई, पनवेल खारघर, पेण, अलिबाग, गुजरात, सुरत, वासदा, नवसारी, राजपिपला, मुहवा या भागातील भाविक रात्रीच सप्तश्रृंगी गडावर दाखल झाले होते. यावेळी भाविकांच्या गर्दीमुळे रस्त्याच्या दुतर्फा रांगा लागल्या होत्या.
त्र्यंबकला गर्दीत वाढ
भगवान त्र्यंबकेश्वराच्या दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांचा ओघ आज दिवसभर सुरूच होता. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून भाविकांनी दर्शन घेतले. भाविकांच्या गर्दीमुळे मंदिर परिसरातील हॉटेल, लॉज, तसेच अन्य छोट्या-मोठ्या व्यावसायिकांच्या उत्पन्नात भर पडल्याचे दिसून आले. वाहनतळावरही वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.