निफाड : यावर्षीच्या शाळा भरण्याचा पहिल्या दिवस, शाळा प्रवेशोत्सव निफाड येथील वैनतेय विद्यालयात आगळ्या वेगळ्या पद्धतीने आनंद मेळा म्हणून ऑनलाइन पद्धतीने मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी घरीच असल्याने या विद्यार्थ्यांना शाळेचा पहिला दिवस आपल्या घरी आनंददायी वाटावा, ऑनलाइनप्रणालीद्वारे शाळेचा परिसर, वर्ग, शिक्षक प्रशासकीय अधिकारी दिसावे यादृष्टीने हा आनंद मेळावा उपक्रम राबविण्यात आला.शाळेच्या प्रत्येक वर्गाच्या ग्रुपवर शाळेच्या पहिल्या दिवशी शाळा भरण्याची घंटा कधी होईल, विद्यार्थ्यांनी गणवेश घालावा, प्रार्थना ऑनलाईन चालू असताना घरी उभे राहायचे, याचा सर्व सूचना पाठवण्यात आल्या होत्या. शाळेच्या पहिल्या दिवशी पालक, विद्यार्थी यांच्या स्वागताचे पत्र ग्रुपवर पाठवण्यात आले. ऑनलाइन पद्धतीने प्रारंभी विद्यार्थ्यांचे आगमन झाल्यानंतर त्यांचे औक्षण करण्यात आले. ऑनलाइन पद्धतीने विद्यार्थ्यांना शाळेचे प्रवेशद्वार, स्वागत फलक, शाळेच्या नावाचा बोर्ड, प्रशासकीय अधिकाऱ्यांचे कार्यालय, कॉम्पुटर लॅब, नव्यानेच केंद्र शासनाच्या अनुदानातून उभारण्यात आलेली अटल टीकंरिंग लॅब, पटांगण, शाळेचे वर्ग, सर्व शिक्षक, फलक लेखन केलेले फळे, शाळेची इमारत या सर्व बाबी ऑनलाइन पद्धतीने विद्यार्थ्यांना व्हिडिओ क्लिपद्वारे दाखवण्यात आल्या. विद्यार्थी जरी घरी असले तरी विद्यार्थ्यांना आपल्या शाळेचे दर्शन व्हावे हा उद्देश होता. शाळा भरण्याच्या वेळेस जी शालेय घंटा वाजते ती घंटा वाजवण्यात आली.ऑनलाइन पद्धतीने झालेल्या आनंद मेळाव्याच्या कार्यक्रमात व्यासपीठावर न्या. रानडे विद्या प्रसारक मंडळाचे विश्वस्त वि. दा. व्यवहारे, रतन पाटील वडघुले, राजेंद्र राठी, मधुकर राऊत, विश्वास कराड, प्राचार्य एस. पी. गोरवे, उपप्राचार्य बी. आर. सोनवणे, पर्यवेक्षक एम. एस. माळी, एन. डी. शिरसाट, प्रा राजेंद्र सूर्यवंशी आदी मान्यवर होते.प्रारंभी राष्ट्रगीत, शालेय प्रार्थना त्यानंतर संस्था गीत विद्यार्थ्यांनी म्हटले त्यानंतर ओमकार ध्वनी म्हणण्यात आली. त्यानंतर मान्यवरांच्या व विद्यार्थ्यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रारंभी दोन विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर चार विद्यार्थ्यांना मोफत पुस्तक वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्तविक प्राचार्य एस. पी. गोरवे यांनी केले. याप्रसंगी ज्येष्ठ शिक्षक बाळकृष्ण ठोके, सृष्टी सोनवणे, संस्कृती जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. (१५ निफाड)
शाळेचा पहिला दिवस, ऑनलाइन पद्धतीने आनंद मेळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2021 10:56 PM
निफाड : यावर्षीच्या शाळा भरण्याचा पहिल्या दिवस, शाळा प्रवेशोत्सव निफाड येथील वैनतेय विद्यालयात आगळ्या वेगळ्या पद्धतीने आनंद मेळा म्हणून ऑनलाइन पद्धतीने मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला.
ठळक मुद्देऑनलाइन पद्धतीने मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरा