ठळक मुद्देदुतोंड्या मारुतीच्या मानेपर्यंत पाणी लागले होते.सात हजार क्यूसेकचा विसर्गगंगापूर धरणाचा जलसाठा संध्याकाळपर्यंत ७८ टक्क्यांवर
नाशिक : जून महिना उजाडल्यापासून नाशिककरांना दमदार पावसाची प्रतीक्षा होती, ही प्रतीक्षा सोमवारी (दि.१६) संपली. गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होणारी जोरदार पर्जन्यवृष्टी व शहरात दिवसभर कोसळणाऱ्या दमदार संततधारेने गोदावरी या हंगामात पहिल्यांदा दुथडी भरून वाहताना नाशिककरांनी बघितली. दुपारनंतर गोदावरीच्या पातळीत प्रचंड वाढ झाली होती. संध्याकाळी ७ वाजेपर्यंत सात हजार ६२ क्यूसेक पाण्याचा विसर्ग गंगापूर धरणातून करण्यात आल्याने नदीला पूर आला होता. नाशिककरांचे पारंपरिक पूरमापक असलेल्या दुतोंड्या मारुतीच्या मानेपर्यंत पाणी लागले होते.
शनिवारी पहाटेपासून शहरासह जिल्ह्यात जोरदार पर्जन्यवृष्टी होत असून, गंगापूर धरणाचा जलसाठा या पंधरवड्यात ६० टक्क्यांनी वाढून सोमवारी संध्याकाळपर्यंत ७८ टक्क्यांवर पोहचला होता. गंगापूर धरणातून होणारा विसर्ग, शहरातील पावसाचे पाणी उपनद्या, नाल्यांमधून येणारे पाणी यामुळे नदीपात्रात पाण्याची पातळी प्रचंड वाढली होती. दुपारी २ वाजेपासून अग्निशामक दलाच्या जवानांकडून नदीकाठालगत सतर्कतेच्या सूचना दिल्या जात होता. संध्याकाळी ५ वाजेपर्यंत दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पुराचे पाणी लागले होते. देवमामलेदार मंदिरासह गंगा-गोदावरी प्राचीन मंदिर व नारोशंकर मंदिरातही पाणी शिरले होते. तसेच नीळकंठेश्वर महादेव मंदिरालाही पाण्याचा वेढा पडला होता. गोरेराम मंदिराच्या खालील बाजूच्या आठ पाय-या पुराच्या पाण्याखाली गेल्या होत्या. दुपारी दोन वाजता चार हजार ७१६ क्यूसेकने पाणी नदीपात्रात सोडण्यात आले होते. त्यामुळे चार वाजेपासून नदीकाठालगतच्या विक्रेत्यांसह रहिवाशांना तातडीने स्थलांतरित होण्याच्या सूचना दिल्या जात होत्या. नीळकंठेश्वर महादेव मंदिराच्या रांगेतील सर्व टप-या पाण्यामध्ये बुडाल्या होत्या. टाळकुटेश्वर मंदिराजवळील सातीआसरा चौकापासून गाडगे महाराज धर्मशाळेकडे जाणारा रस्ता पुराच्या पाण्यात हरविला होता.
सात हजार क्यूसेकचा विसर्गनदीचे सर्वच लहान पूल पाण्यामध्ये हरविले होते. नदीचा वाढता जलस्तर लक्षात घेता विक्रेत्यांनी तातडीने दुकाने हटवून घेतली. संध्याकाळी ६ वाजता दुतोंड्या मारुतीच्या मानेला पुराचे पाणी लागले. गंगापूर धरणातून सुरू असलेला विसर्ग सात हजार ६२ क्यूसेकवर पोहचला होता. रात्री पर्जन्यवृष्टी कायम राहिल्यास विसर्ग अधिक वाढविण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.