‘ज्ञानेश्वरी’ ही पहिली वाचक चळवळ
By admin | Published: January 11, 2015 12:54 AM2015-01-11T00:54:03+5:302015-01-11T00:54:23+5:30
विनायकदादा पाटील : ‘ग्रंथाली’च्या पाच पुस्तकांचे प्रकाशन
नाशिक : साहित्य सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचणे गरजेचे असते. त्या अर्थाने ‘ज्ञानेश्वरी’ ही पहिली वाचक चळवळच म्हणावी लागेल. लेखकांनी सर्वांना आपलेसे केले तरच साहित्य पुढे जाईल, असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते विनायकदादा पाटील यांनी केले.
ग्रंथाली प्रकाशनाच्या वतीने आयोजित पुस्तक प्रकाशन समारंभात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. यावेळी ‘निवडक कथा : अरुण साधू’ (संपादन मीना गोखले), ‘बॉम्बे स्कूल आठवणीतले, अनुभवलेले’ (सुहास बहुळकर), ‘काळा तुकतुकीत उजेड’ (किशोर पाठक), ‘थांबवू शकत नाही कविता लिहिणं’ (सायमन मार्टिन) व ‘भाषाग्रहण आणि भाषाशिक्षण’ (रमेश पानसे) या पाच पुस्तकांचे प्रकाशन पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी ‘ग्रंथाली’चे विश्वस्त सुदेश हिंगलासपूरकर, ज्येष्ठ पत्रकार अरुण साधू, ज्येष्ठ चित्रकार सुहास बहुळकर, कवी सायमन मार्टिन, किशोर पाठक, दीपक घारे, आमदार हेमंत टकले आदि व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी संबंधित लेखकांनी आपल्या पुस्तकामागील भूमिका स्पष्ट केली. वीणा सानेकर यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)