नाशिक : भारतीय सैन्यदलाचा पाठीचा कणा मानल्या जाणाऱ्या कॉम्बट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कूलमध्ये (कॅट्स) पहिल्यांदाच लढाऊ वैमानिकांच्या ४७ प्रशिक्षणार्थींच्या तुकडीत दोन महिलांना संधी देण्यात आली आहे. नाशिकच्या गांधीनगर येथील कॅट्सच्या रन-वे वरून हेलिकॉप्टर उड्डाणाचे धडे या महिलांना दिले जाणार आहे.
'प्रेसिडेंट कलर्स'चा बहुमान प्राप्त असलेल्या नाशिकमधील कॅट्स हे लढाऊ वैमानिक घडविणारे देशातील प्रख्यात केंद्र आहे. शिमला येथील आर्मी प्रशिक्षण कमांडच्या नेतृत्वाखाली कार्यान्वित आहे. गेल्या २ तारखेलाच कॅट्समधून ३५ अधिकाऱ्यांची तुकडी लढाऊ विमानचालनाचे प्रशिक्षण पूर्ण करून देशसेवेत दाखल झाली. आतापर्यंत या केंद्रातून केवळ पुरुष अधिकारी यांनाच प्रशिक्षण दिले जात होते. यावर्षी प्रथमच दोन महिला कॅप्टन यांची या प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली आहे.
भारतीय लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी महिला अधिकाऱ्यांना सैन्याच्या विमान वाहतुकीची निवड करण्याची परवानगी देण्याचा प्रस्ताव मंजूर केला होता. यानंतर काही महिन्यांनी हेलिकॉप्टर उड्डाणाचे प्रशिक्षण घेण्यासाठी दोन महिला अधिकाऱ्यांची प्रथमच निवड करण्यात आली आहे.
पंधरा महिला अधिकाऱ्यांनी लष्करी विमानचालनात सामील होण्यासाठी स्वइच्छेने प्रस्ताव दिले होते; मात्र 'पायलट एप्टीट्यूड बॅटरी टेस्ट' (पीएबीटी) आणि वैद्यकीय चाचणीनंतर केवळ दोन महिलांची निवड झाली. या महिला अधिकाऱ्यांची नावे मात्र समजू शकली नाहीत. पुढील वर्षी जून किंवा जुलैमध्ये या तुकडीचे लढाऊ हेलिकॉप्टर उड्डाणाचे प्रशिक्षण पूर्ण होणार आहे. त्यानंतर त्या फ्रंट-लाइन फ्लाइंग कर्तव्य बजावण्यासाठी देशसेवेत सामील होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
---इन्फो----
कॅट्सच्या ताफ्यात सध्या चित्ता, चेतक आणि ध्रुव हे तीन हेलिकॉप्टर आहेत. आतापर्यंत रुद्र हे हलके लढाऊ हेलिकॉप्टर दाखल झालेले नाही. या दोन्ही महिला अधिकारी वरील हेलिकॉप्टरद्वारे उड्डाणाचे धडे गिरविणार आहेत.