नाशिक : येथील एमएच १५ ट्रेकिंग ग्रुपने महाराष्ट्राचे माऊंट एव्हरेस्ट समजले जाणारे कळसूबाई शिखर यशस्वीरीत्या सर केले. विशेष बाब म्हणजे या ग्रुपमधील सर्वात लहान सदस्य साडेपाच वर्षांच्या ओवी योगेश शिंदे हिनेही हा अवघड ट्रेक पूर्ण करत चिमुकल्यांपुढे आदर्श ठेवला.
एमएच १५ ट्रेकिंग ग्रुपच्यावतीने वेगवेगळ्या ट्रेकचे आयोजन केले जाते. गेल्या रविवारी (दि. २६) या ग्रुपचे सदस्य रमेश लोहार, डॉ. योगेश शिंदे, रुद्राक्ष लोहार, प्रकाश सपकाळे व ओवी शिंदे यांनी कळसूबाई शिखर सर केले. यात साडेपाच वर्षांच्या ओवीने पूर्ण केलेला ट्रेक लक्षवेधी ठरला. याबाबत ओवीचे वडील योगेश शिंदे यांनी सांगितले, गेल्या वर्षी जानेवारीत मी स्वतः कळसूबाई ट्रेक पूर्ण केल्याने पूर्ण ट्रेकचा अंदाज होता. फक्त अंतर आणि वेळ या गोष्टीचा विचार करता ओवी ट्रेक पूर्ण करेल असा विश्वास होता. परंतु अगदीच वेळेवर काही अडचणी येऊ शकतात का याचा अभ्यास केला. यासाठी पुन्हा एकदा स्वतःचेच मागचे कळसूबाई ट्रेकिंगचे फोटो शोधून त्यांचा नीट अभ्यास केला.
त्यातून लोखंडी जिन्यांव्यतिरिक्त बाकी ट्रेक नक्की ओवी पूर्ण करेल. जिन्याच्या अभ्यासासाठी पुन्हा वेगवेगळ्या ५-६ ब्लॉगर्सचे यूट्यूब वरील व्हिडिओ बघितले. जिन्यांची लांबी, रुंदी, उंची यांचा पूर्ण अंदाज घेतला. सोबतच्या सहकाऱ्यांच्या साथीने अखेर ओवीने हा ट्रेक पूर्ण केला. ओवीने रामशेज, चामरलेणी, सप्तशृंगी गड, रडतोंडी असे ट्रेकही पूर्ण केले आहेत.घरात आम्ही दोघेही डॉक्टर असल्याने ओवीच्या आहार-विहाराकडे विशेष लक्ष आहे. ओवीचा आहार नेहमीच चौरस ठेवण्याचा प्रयत्न करते. त्यात प्रथिनयुक्त पदार्थांसाठी पनीर, अंडे यांचा विशेष वापर होतो. फास्टफूड, जंकफूड यापासून शक्य तितके लांब ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करतो. टीव्हीवरदेखील यासंदर्भातील कार्यक्रम तिला दाखविण्यास भर असतो.- डॉ. अपूर्वा खांडे - शिंदे.फोटो- २७ ओवी शिंदे