कांदा निर्यात प्रोत्साहन योजनेस मुदत वाढ
By admin | Published: April 6, 2017 12:18 AM2017-04-06T00:18:35+5:302017-04-06T00:18:45+5:30
लासलगाव/येवला : भारतातून निर्यातदारांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र शासनाने सुरू केलेल्या कांदा निर्यात प्रोत्साहन (एमइआयएस) योजनेस येत्या ३० जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
लासलगाव/येवला : भारतातून जास्तीत जास्त कांदा निर्यात होण्यासाठी व निर्यातदारांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र शासनाने सुरू केलेल्या कांदा निर्यात प्रोत्साहन (एमइआयएस) योजनेस येत्या ३० जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
भारतातून व्यापारी वस्तूंच्या निर्यातीसंबंधी असलेल्या निर्यात प्रोत्साहन (एमइआयएस) योजनेंतर्गत निर्यातदारांनी पाठविलेल्या कांद्यास पाच टक्के अनुदान देण्याबाबत केंद्र शासनाने यापूर्वी निर्णय घेतलेला आहे. मात्र सदर योजनेची मुदत दि. ३१ डिसेंबर, २०१६ रोजी संपली होती. त्यानंतर केंद्र शासनाच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयातील वाणिज्य विभागाच्या विदेश व्यापार महानिदेशालयाने दि. ३० डिसेंबर, २०१६ रोजी प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार सदर योजनेस दि. ३१ मार्च, २०१७पर्यंत मुदतवाढ दिली होती.
सदर योजनेमुळे कांदा निर्यातीस प्रोत्साहन मिळून मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी जास्त प्रमाणात कांद्याची निर्यात झाली. मात्र योजनेची वाढीव मुदत दि. ३१ मार्च संपुष्टात आल्याने केंद्र शासनाने सदर योजनेस मुदतवाढ द्यावी, अशी मागणी लासलगाव बाजार समितीच्या वतीने सभापती जयदत्त होळकर यांनी केली होती. तसेच मुदतवाढ न दिल्यास त्याचा कांदा निर्यातीवर परिणाम होऊन पर्यायाने कांदा दरात अजून घसरण होण्याची शक्यता असल्याने बाजार समितीने सदर योजनेस जास्त कालावधीसाठी मुदतवाढ द्यावी तसेच अनुदान रकमेत वाढ करावी, अशी मागणी केंद्र व राज्य शासनाकडे केली होती. (लोकमत ब्युरो)