नाशिकमधून थेट दिल्लीपर्यंत हवी विमानसेवा
By admin | Published: April 21, 2017 01:21 AM2017-04-21T01:21:57+5:302017-04-21T01:22:06+5:30
नाशिक : ओझर येथील विमानतळावरून विमानसेवा सुरू झाल्यास थेट दिल्लीपर्यंत सेवा असावी, असे नाशिककरांचे मत असून ३४.३ टक्के नागरिकांनी तसा कौल दिला आहे
नाशिक : ओझर येथील विमानतळावरून विमानसेवा सुरू झाल्यास थेट दिल्लीपर्यंत सेवा असावी, असे नाशिककरांचे मत असून ३४.३ टक्के नागरिकांनी तसा कौल दिला आहे तर बेंगळुरू आणि गोवा त्यानंतरची पसंती ठरली आहे. हॉपिंग फ्लाइटसाठी मात्र मुंबईमार्गे जाण्यासाठी सुमारे साठ ते सत्तर टक्के नागरिकांनी मान्यता दिली आहे.
ओझर विमानतळावरून विमानसेवा सुरू करण्यासाठी अनेक कंपन्या इच्छुक असून, त्यांनी नाशिककरांचा पसंतीक्रम कसा राहील याबाबत माहिती संकलित करण्याचे काम सुरू केले. त्यांना मदत म्हणून नाशिकमधील काही उद्योजक आणि अन्य नागरिकांनी फेसबुक सर्व्हे सुरू केला आणि त्यानुसार विहित लिंकवर आपले मत नोंदविले आहे. गुरुवारपर्यंत दहा हजार ५०० नागरिकांनी या लिंकवर मत नोंदविले असून, त्यापैकी ३४.३ टक्के नागरिकांनी नाशिकहून थेट दिल्लीपर्यंत विमानसेवा असावी, असे मत व्यक्त केले आहे. २७.१ टक्के नागरिकांनी बेंगळुरूपर्यंत सेवा असावी, असे मत व्यक्त केले आहे.
हैदराबाद, चेन्नई आणि अहमदाबादचा क्रमांक त्यानंतर लागतो. हैदराबादपर्यंत थेट सेवा सुरू व्हावी असे मत १२.४ टक्के तर चेन्नई आणि अहमदाबादसाठी केवळ ३.९ टक्के नागरिकांनी पसंती दर्शविली आहे. सर्वात कमी म्हणजे २.९ टक्के नागरिकांनी कोलकाता येथे सेवा सुरू करावी, असे मत व्यक्त केले आहे.
नाशिकहून हॉपिंग फ्लाइट सुरू करायचे ठरल्यास मुंबई मार्गेच ही सेवा असावी यामतावर ७० टक्क्यांहून अधिक नागरिक ठाम आहेत. त्यामुळे थेट नाशिक मुंबई सेवेपेक्षा मुंबईमार्गे अन्यत्र जाण्यासाठी विमानसेवा असावी असा निष्कर्ष निघाला असल्याची माहिती उद्योजक मनीष कोठारी यांनी दिली. (प्रतिनिधी)