नाशिक : कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या निर्बंधाचा अनेकजण आपापल्या परीने अर्थ काढत असल्याने जिल्हा प्रशासनाला वारंवार त्याबाबतचे स्पष्टीकरण द्यावे लागत आहेे. बुधवारी शहरातील अनेक खाद्यपदार्थांची दुकाने आणि हातगाडी, ढाबे रात्री ९ वाजेपर्यंत सुरू होते. वास्तविक अशा विक्रेत्यांना सकाळी ७ ते सायंकाळी ७ या वेळेतच त्यांची दुकाने सुरू ठेवता येणार असल्याचे स्पष्टीकरण जिल्हा प्रशासनाने दिले आहे.
बुधवारपासून शहर जिल्ह्यात बाजारपेठांना लागू करण्यात आलेल्या निर्बंधांचे पालन करण्यास सुरुवात झालेली आहे. सकाळी ७ ते सायंकाळी ७ या कालावधीत दुकाने सुरू राहाणार आहेत तर हॉटेल्स, परमिट रूम, बार यांना रात्री ९ वाजेपर्यंतची परवानगी देण्यात आलेली आहे. असे असतानाही खाद्यपदार्थ विक्री करणारे अनेकांनी रात्री ९ पर्यंत दुकाने सुरू ठेवली होती. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा आदेशातील स्पष्टता जाहीर केली आहे. खाद्यगृहे म्हणजेच हाॅटेल्स, परमिट रूम, बार ज्यामध्ये ग्राहकांचे आगमन आणि निर्गमन बंदिस्त जागेत नियंत्रित होऊ शकते आणि त्याठिकाणी खाद्यपदार्थ सेवन करण्यासाठी टेबलांची व्यवस्था असते त्यांनाच रात्री ९ वाजेपर्यंतची परवानगी आहे. शनिवार आणि रविवारीदेखील ती सुरू राहाणार आ हेत. इतर कोणत्याही खाद्यस्थळांना याबाबतची मुभा देण्यात आलेली नाही. परवाना असलेली हातगाडी, ठेले, स्टॉल्स, फुड जंक्सशन्स व तत्सम ठिकाणे इतर दुकानांप्रमाणेच सकाळी ७ ते सायंकाळी ७ या वेळेतच मार्गदर्शक तत्तवांचे पालन करून सुरू राहू शकतात. शनिवार, रविवार त्यांना बंद ठेवावा लागणार आहे.
असे असतानाही अशा हातगाड्या, स्टॉल्स, स्वीटमार्ट सुरू राहिल्यास आणि तेथे गर्दी झाल्यास त्यांच्यावर फौजदारी कारवाई केली जाईल, असे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी कळविले आहे.