नाशिक : सातपूरला बिबट्या फिरतोय..., पांगरे मळ्यात बिबट्या ूदिसला... अहो, साहेब मुंबईनाका येथे बिबट्याने नासर्डीत उडी घेतल्याचे पाहिले... कर्मयोगीनगरमध्ये बिबट्याचा संचार, कुत्री खूप भुंकत आहेत... साहेब तिडके कॉलनीत बिबट्या फिरताना दिसतोय पिंजरा तत्काळ लावा..., असे एक ना अनेक फोन वनविभागाच्या अधिकाऱ्यांना संध्याकाळी सात वाजेपासून रात्री दहा वाजेपर्यंत सुरूच आहे, यामुळे वनविभागाच्या तीन गस्ती पथक शहरात ठिकठिकाणी भेट देऊन खात्री करत असताना नागरिकांच्या एकाही ‘कॉल’मध्ये तथ्य आढळून आले नाही, असे वनक्षेत्रपाल विवेक भदाणे यांनी सांगितले.वनविभागाचे दक्षता पथकासह नाशिक पश्चिम विभागाचे दोन असे एकूण तीन गस्तीपथक आॅन रोड असून रेस्क्यू टीमचे पथक सज्ज ठेवण्यात आले आहे. यामळे नागरिकांनी विनाकारण घबराट पसरवू नये, तसेच बिबट्या दिसल्याचे बिनबुडाचे निराधार मेसेज सोशलमिडियावर टाकून बेजबाबदार वर्तन करू नये, अन्यथा अफवा पसरविल्याप्रकरणी थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा इशाराही आता वनविभागाकडून देण्यात आला आहे. कोणतीही खात्री न करता, एखाद्या परिसराचे नाव टाकून अफवा पसरविल्या जाता आहेत. या अफवांना नागरिकांनी बळी पडू नये आणि वन्यजीव-मानव संघर्ष टाळण्यासाठी वनविभागाला सहकार्य करावे. खोट्या पोस्ट व्हायरल करणार्यांवर आता थेट गुन्हे दाखल करण्याची तयारी नाशिक पश्चिम वनविभागाने केली असल्याचे भदाणे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.नागरिकांनी पुरेशी खबरदारी नक्कीच घ्यायला हवी, सतर्कता बाळगून आपली सुरक्षितता टिकवावी, मात्र अशाप्रकारे बेभान होऊन विनाकारण सोशलमिडियाचा गैरवापर करून परिसरात घबराट निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन वनविभागाने केले आहे.दक्षता पथकाचे वनक्षेत्रपाल एम.बी.पाटील, भदाणे यांच्या नेतृत्वाखाली रात्रपाळीकरीता तीन पेट्रोलिंग वाहनांद्वारे २ वनपाल, प्रत्येकी ३ वनरक्षकांचे पथक गस्तीवर आहेत. वनविभागाचे सर्व गस्तीपथक सतर्क असून सातत्याने पोलीस नियंत्रण कक्षाच्या संपर्कातही आहे. कुठल्याहीप्रकारचा ‘अॅलर्ट’ वनविभागाने दिलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी अशा अफवांच्या मॅसेजकडे सपेशल दुर्लक्ष करावे, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
वनविभागाचा दावा : नेटिझन्सकडून फिरणारे ‘बिबट्या दर्शन’चे मेसेज निराधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2020 10:57 PM
बिबट्या दिसल्याचे बिनबुडाचे निराधार मेसेज सोशलमिडियावर टाकून बेजबाबदार वर्तन करू नये, अन्यथा अफवा पसरविल्याप्रकरणी थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा इशाराही आता वनविभागाकडून देण्यात आला
ठळक मुद्देकुठल्याही प्रकारचा ‘अॅलर्ट’ वनविभागाने दिलेला नाहीवनविभागाचे तीन गस्तीपथक