नाशिक : नांदगाव तालुक्यातील जळगाव महामार्गालगत पोखरी शिवारात असलेल्या राखीव वनजमिनीवर दहा एकरात अवैधरित्या कांदा मार्केट प्रकल्प उभारण्यात येत होता. जवळपास अंतीम टप्प्यात पोहचलेल्या बांधकामाची गुप्त माहिती वनाधिकाऱ्यांना मिळाली असता वणी दक्षता पथकाने याठिकाणी गुरुवारी (दि.३०) छापा टाकला. हा प्रकल्पदेखील लवकरच संपुर्ण ‘सील’ करण्यात येणार आहे.
नाशिक जिल्ह्यातील विशेषत: नांदगाव तालुक्यातील वनजमिनींचा वापर कसण्याऐवजी व्यावसायिक वापरासाठी सर्रासपणे केला जात आहे. वनक्षेत्राचा मुळ दर्जा हा कधीही बदलत नसतो तो कायद्याने नेहमीच ‘वन’ राहतो. यामुळे वनजमिनींची खरेदी-विक्री करता येऊ शकत नाही. भोगवटदार-२जमिनीची विक्री होत नाही ती केवळ वारसहक्काने वारसांकडे हस्तांतरीत होते; मात्र त्यासाठी केंद्र सरकारची परवानगी अनिवार्य असते. या वनजमिनीचा खरेदी-विक्रीचा व्यवहार हा बेकायदेशीर असून तो रद्द करणे आवश्यक असल्याचे वनविभागाने म्हटले आहे. या वनजमिनीवर (राखीव वन कक्ष क्र४९२) सुमारे दहा एकर जागेवर कांदा मार्केट प्रकल्प उभारला जात असल्याची तक्रार मुख्य वनसंरक्षक नितीन गुदगे, उपवनसंरक्षक उमेश वावर यांना प्राप्त झाली होती. यानुसार त्यांनी खातरजमा करत कारवाईचे आदेश विभागीय वन अधिकारी विशाल माळी यांना दिले. माळी यांनी वणी फिरते पथकाचे वनपरिक्षेत्र अधिकारी संजय पवार यांच्या पथकसोबत घेत छापा टाकला. यावेळी संशयित सानप ॲग्रो प्रा.लिमिटेड या कंपनीच्या संचालकांविरुद्ध वन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महसुलकडून कसण्यासाठी मिळालेल्या जमिनीचे भोगवटदार-१मध्ये रूपांतर करत वनविभागाची कुठलीही परवानगी न घेता संशयित प्रशांत शिवाजीराव सानप यांनी खरेदी घेऊन या वनक्षेत्रावर कांदा मार्केट प्रकल्प उभारणी सुरू केल्याचे आढळून आल्याचे माळी यांनी सांगितले. यामुळे हा प्रकल्प हटविण्याचे निर्देश संबंधितांना देण्यात आले आहे.