अज्ञानाच्या आवरणामुळे आत्मरूप अस्पष्ट :महंत रामगिरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2019 07:01 PM2019-08-11T19:01:23+5:302019-08-11T19:01:41+5:30
मनाचा गढूळपणा, चंचलपणा, मलिनता आणि अज्ञानाचे आवरण गेल्याशिवाय आत्मरूप स्पष्ट दिसत नाही. त्यासाठी संतसंगती घडावी लागते. संत हे चंद्राप्रमाणेच शीतल आणि आनंद देणारे असतात. संत योग्यतेप्रमाणे उपदेश देतात. चंद्रावर डाग आहेत; पण संतांचे चारित्र्य निर्मल आहे. सूर्य जगाला प्रकाश आणि उष्णता देतो; पण तो दाहक आहे, तर संत ज्ञानाचा प्रकाश देतात; परंतु ते दाहक नाहीत. संतांचे सान्निध्य असेल तर मनुष्य स्थितप्रज्ञ बनू शकतो, असा हितोपदेश महंत रामगिरी यांनी दिला.
येवला : मनाचा गढूळपणा, चंचलपणा, मलिनता आणि अज्ञानाचे आवरण गेल्याशिवाय आत्मरूप स्पष्ट दिसत नाही. त्यासाठी संतसंगती घडावी लागते. संत हे चंद्राप्रमाणेच शीतल आणि आनंद देणारे असतात. संत योग्यतेप्रमाणे उपदेश देतात. चंद्रावर डाग आहेत; पण संतांचे चारित्र्य निर्मल आहे. सूर्य जगाला प्रकाश आणि उष्णता देतो; पण तो दाहक आहे, तर संत ज्ञानाचा प्रकाश देतात; परंतु ते दाहक नाहीत. संतांचे सान्निध्य असेल तर मनुष्य स्थितप्रज्ञ बनू शकतो, असा हितोपदेश महंत रामगिरी यांनी दिला. तळवाडे येथे आयोजित हरिनाम सप्ताहात त्यांनी पाचव्या प्रवचनाचे पुष्प गुंफले. यावेळी व्यासपीठावर येवला पंचायतचे सभापती रूपचंद भागवत, ह.भ.प. मधू महाराज उपस्थित होते.
आपल्या विवेचनात महंत रामगिरी यांनी, देव नाही म्हणणाऱ्यांची शंका दूर करण्याचा प्रयत्न केला. अग्नी लाकडात असतो, पण घर्षण झाल्याशिवाय दिसत नाही, दुधात तूप असतेच पण ते दुधाचे दही लोणी केल्यावरच दिसते. ब्रह्म जाणण्यासाठी मतिमंदता चालत नसते. थोडे संकट आले तर लोक विचारतात देव आहे कुठं? पण देव ही काही सामान्यरूपात दिसण्याची गोष्ट नाही. देव अनुपेक्षा छोटा आणि ब्रह्मांडापेक्षा मोठा आहे.