सातपूर : मशिदीवरील भोंगे काढण्याबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलेल्या आदेशानुसार बुधवारी (दि.४) सातपूरच्या मनसे पदाधिकाऱ्यांनी हनुमान चालिसा लावण्याची तयारी सुरू केली. यावेळी सातपूर पोलिसांनी मनसेच्या सहा पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेत अटक केली. तसेच मनसेचे माजी नगरसेवक सलीम शेख यांना त्यांच्या निवासस्थानी पोलिसांनी स्थानबद्ध केले होते. सातपूर परिसरात दिवसभर शांतता होती व सर्व व्यवहार सुरळीत सुरू होते.
सातपूर येथील रजविया मशिदीजवळ बुधवारी पहाटे मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सातपूर बसस्टॉपजवळ जमून ध्वनिक्षेपकावर हनुमान चालिसा लावण्यापूर्वीच सातपूर पोलिसांनी मनसेचे विभागप्रमुख योगेश लभडे, शहर उपाध्यक्ष सचिन सिन्हा, विजय अहिरे, सरचिटणीस मिलिंद कांबळे,उपविभाग अध्यक्ष विशाल भावले, रस्ते आस्थापना संपर्क अध्यक्ष अतुल पाटील यांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र चव्हाण, सतीश घोटेकर यांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे. त्यांच्याकडून भोंगा, बॅटरी जप्त केली आहे. मध्यरात्रीपासून सातपूर पोलिसांनी मशिदीच्या परिसरात चोख बंदोबस्त ठेवला होता.
----इन्फो ---
मंगळवारी रात्रीपासूनच घरात बंदीस्त
मनसेचे माजी नगरसेवक सलीम शेख यांना मंगळवारी रात्रीच सातपूर पोलिसांनी त्यांच्या घरी स्थानबद्ध केले होते. त्यांच्या घराबाहेर पोलीस तैनात करण्यात आले होते. त्यामुळे शेख यांना घराबाहेर पडता आले नाही. तर दुसरे नगरसेवक योगेश शेवरे यांना पोलिसांनी मंगळवारी रात्रीच ताब्यात घेतले होते. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे वाद नको म्हणून रजविया मशिदीत बुधवारी पहाटेची अजान भोंग्याविनाच झाल्याचे समजते.