नाशिक पॅटर्न ! ... म्हणून राज ठाकरेंच्या राष्ट्रवादीसोबतच्या सलगीचीच चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2019 04:14 PM2019-10-09T16:14:14+5:302019-10-09T16:17:01+5:30
संजय पाठक नाशिक : राज ठाकरे हे सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या विरोधात बोलत आहेत. त्यांनी ...
संजय पाठक
नाशिक : राज ठाकरे हे सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या विरोधात बोलत आहेत. त्यांनी कोणत्याही प्रकारे विरोधकांत सामील होण्याचे टाळले असले तरी त्यांचा कल राष्ट्रवादीच्या बाजूनेच असल्याचे दिसते आहे. पुण्याकडे कोथरूड मतदारसंघात भाजपच्या विरोधात मनसे उमेदवाराला पाठिंबा देण्याची जी खेळी खेळली गेली तशी नाशिकमध्ये दोन ते तीन मतदारसंघात करण्याची संधीदेखील होती. मात्र, केवळ नाशिक पूर्व मतदार संघातूनच ती यशस्वी करण्यात आली. मनसेचे माजी महापौर अशोक मुर्तडक यांनी निवडणूक लढविण्याची आपली तयारीच नसल्याचे सांगत माघार घेतली, त्यामुळे राष्ट्रवादीच्या उमेदवाराला बळ मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. मनसेच्या माघारीपेक्षा राज ठाकरे यांच्या राष्ट्रवादीच्या सलगीचीच चर्चा जास्त होत आहे.
राज ठाकरे यांनी पक्ष स्थापनेपासून ‘एकला चलो’चा नारा दिला आहे. त्यामुळे मनसे कोणाशी फक्त सार्वत्रिक निवडणुकीत युती करणार नाही, असा त्याचा अर्थ होतो. याचे कारण म्हणजे २००९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेचे तेरा आमदार स्वबळावर निवडून आले होते. त्यानंतर नाशिक महापालिकेच्या झालेल्या निवडणुकीत मनसेचे चाळीस नगरसेवक निवडून आले. त्यावेळी बहुमताचा जादुई आकडा गाठण्यासाठी त्यांनी भाजपशी युती करून सत्ता मिळवली तर अडीच वर्षांच्या महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपशी काडीमोड घेऊन राष्ट्रवादी आणि कॉँग्रेस आघाडीला बरोबर घेऊन त्यांनी सत्ता उपभोगली होती. विशेष म्हणजे महापालिकेच्या निवडणुकीत आलेल्या राज ठाकरे यांनी त्यावेळी नाशिक जिल्ह्याचे सर्वेसर्वा असलेल्या राष्ट्रवादीचे नेता आणि पालकमंत्री छगन भुजबळ यांनावर त्यांनी घणाघाती टीका केली होती, तर भुजबळ यांनीदेखील मग राज यांच्यावर कडाडून टीका केली होती. तेच राष्ट्रवादीचे नेते आज राज यांच्यादृष्टीने अत्यंत कळीची भूमिका निभावत आहेत.
राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक लढवावी किंवा नाही याबाबत संभ्रम दूर करून नाशिक-पुणे आणि मुंबईत निवडणूक लढवण्याचे ठरविले खरे, परंतु स्वबळाचा हा नारा न करताही ते विरोधकांबरोबर आहेत, हे एव्हाना स्पष्ट झाले आहे. स्वत: छगन भुजबळ यांनीच याबाबत वाच्यता करताना ज्या ठिकाणी राष्ट्रवादीला अडचण नाही त्याठिकाणी मनसे उमेदवाराला पाठिंबा देण्यात येईल असे स्पष्ट केले आहे. कोथरूडमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात किशोर शिंदे या मनसे उमेदवाराला पाठिंबा हा त्याचाच एक भाग असला तरी त्याच धर्तीवर नाशिकच्या पूर्व मतदारसंघात भाजपने उमेदवारी नाकारल्याने राष्ट्रवादीत दाखल झालेले बाळासाहेब सानप यांच्यासाठी यांना केवळ छगन भुजबळ यांच्या शब्दाखातर राज यांनी पाठिंबा दिला आणि मनसेचे माजी महापौर तसेच तुल्यबळ लढत देणाऱ्या अशोक मुर्तडक यांनी थेट माघार घेतली. मुर्तडक यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार बाळासाहेब सानप यांना पाठिंबा दिला नाही. मात्र, मतदारसंघातील जातीय समीकरणे बघता मुर्तडक यांची माघार सानप यांच्या पथ्यावर पडली आहे. त्यामुळे राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीला समर्थनाची भूमिका अधिकृतरीत्या जाहीर केली नसली तरी राष्ट्रवादीच्या सोयीची तरी नक्कीच ठरली आहे.