वावी पासून सुमारे ४ किलोमीटर अंतरावर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने हरणाला जीव गमवावा लागला. पाण्याच्या शोधार्थ हरणे सिन्नरच्या पूर्व भागात फिरत असल्याचे चित्र गेल्या काही दिवसांपासून दिसू लागले आहेत. मिरगाव, पिंपरवाडी या परिसरात नदी काठालगत दाट झाडी असल्याने या परिसरात हरणांचे वास्तव्य दिसून येत आहे. मात्र पिण्यासाठी पाणी नसल्याने हरणांना पाण्याच्या शोधात महामार्ग ओलांडून जावे लागते. महामार्ग ओलांडतांना काही हरणांना अपघाताचा सामना करावा लागत आहे. त्यात काही हरणे जखमी झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. बुधवारी सकाळी या महामार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सायाळे फाट्याजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत हरणाचा मृत्यू झाल्याचे दिसून आले. वाहनाची जोरदार धडक बसल्याने हरणाचा जागेवर मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर वनविभागाच्या परवानगीने वावी येथील क्र ेन चालक किरण पाटील, दीपक वेलजाळी घटनास्थळी गेले. हरणाचा मृतदेह वन विभागाचे कर्मचारी के. आर. इरकर यांच्या ताब्यात देण्यात आला.
वावीजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत हरणाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 5:47 PM