नाशिक : महापालिकेमार्फत शहरातील सहाही विभागांत १५ हजार वृक्षांची लागवड करण्याच्या प्रस्तावाला स्थायी समितीने गुरुवारी मंजुरी दिली. महिनाभरात वृक्षलागवडीची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त अनिल चव्हाण यांनी दिली.मनपाने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, शहरातील सहाही विभागात २१ हजार वृक्षलागवडीचा कार्यक्रम हाती घेतला होता. त्यानुसार, निविदाप्रक्रिया राबविण्यात आली, परंतु लागवडीसाठी १५ फुटावरील वृक्षाची अट ठेवण्यात आल्याने निविदा प्रक्रियेला प्रतिसाद लाभला नाही. सुरुवातीला काही ठेकेदारांनी प्रतिसाद दिला. त्यानुसार त्यांना कार्यादेशही देण्यात आले, परंतु एक ठेकेदार वगळता इतरांनी वृक्षलागवडीसाठी असमर्थता दर्शविली होती. त्यामुळे प्रशासनाने चार ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याची कार्यवाही केली होती. दरम्यान, महापालिकेने १५ फुटाच्या वृक्षाची अट शिथिल करून ती १० फुटावर आणली आणि नव्याने निविदाप्रक्रिया राबविली. त्याला प्रतिसाद लाभल्यानंतर प्रशासनाने १५ हजार १६० वृक्षलागवडीसाठी सुमारे ३ कोटी ७६ लाख रुपये खर्चाचा प्रस्ताव तयार करत तो स्थायी समितीवर मंजुरीसाठी ठेवला होता. स्थायी समितीने सदर प्रस्तावाला मान्यता दिली आहे. त्यामुळे शहरात उर्वरित १५ हजार वृक्षलागवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. (प्रतिनिधी)
सहा विभागांत १५ हजार वृक्षलागवडीचा मार्ग मोकळा
By admin | Published: October 14, 2016 12:00 AM