पंचवटी : संपूर्ण देशात कोरोना विषाणूंनी थैमान घातला आहे कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी खबरदारी घ्यावी अशा सूचना प्रशासनाकडून दिल्या जात आहेत, मात्र दिंडोरीरोडवर असलेल्या नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या तरी डिस्टन्सिंगचा पूर्णपणे फज्जा उडाल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे याकडे बाजार समिती व जिल्हा प्रशासन या दोहोंचे दुर्लक्ष झाल्याने बाजार समितीत शेतकरी, व्यापारी, हमाल आणि आडते यांसह अन्य बाजार समिती घटकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.बाजार समितीत दैनंदिन दुपारी व सायंकाळी शेतमाल विक्रीला दाखल होते. नागरिकांची आणि किरकोळ विक्री करणाऱ्यांची मोठी गर्दी होत असल्याने काही दिवसांपूर्वी खबरदारी म्हणून बाजार समितीत किरकोळ विक्री बंद करण्यात आली आहे. दुपारी व सायंकाळी होणा-या लिलावप्रक्रिया दरम्यान बाजार समितीच्या घटकांची मोठी गर्दी होत आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे फिजिकल डिस्टन्सिंग पाळले जात नाही तसेच काही दिवसांपूर्वी बाजार समितीने प्रवेशद्वारावर सॅनिटायझर ठेवले होते व प्रत्येकाला हाताला लावून आत सोडले जायचे. शेतमाल लिलाव आटोपल्यावर बाजार समिती संपूर्ण आवारात औषध फवारणी केली जायची मात्र काही दिवसांपासून सॅनिटायझर्स दिले जात नाही व औषध फवारणी केली जात नाही अशी खंत व्यापारी, शेतकरीबांधवांनी व्यक्त केली आहे.बाजार समितीत मोठ्या प्रमाणात गर्दी होत असली तरी याकडे बाजार समिती प्रशासनाचे सध्या तरी पूर्णत: दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे कोरोनासारख्या आजाराचा संसर्ग वाढू शकतो यामुळे व्यापारी, आडते, हमाल, मापारी आणि शेतकरीवर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे. बाजार समिती कर्मचाऱ्यांवर अंकुश नसल्याने डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे.
बाजार समितीत फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2020 10:50 PM