त्र्यंबकेश्वरी फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:11 AM2021-05-31T04:11:09+5:302021-05-31T04:11:09+5:30
रुग्ण हक्क सनद लावण्याची मागणी येवला : कोरोना काळात अनेक खासगी रुग्णालयांकडून रुग्णांची लूट सुरू असून संबंधितांवर कारवाई करावी ...
रुग्ण हक्क सनद लावण्याची मागणी
येवला : कोरोना काळात अनेक खासगी रुग्णालयांकडून रुग्णांची लूट सुरू असून संबंधितांवर कारवाई करावी तसेच जिल्ह्यातील प्रत्येक रुग्णालयाच्या दर्शनी भागात कोरोनासह सर्व आजारावरील दरपत्रक, रुग्ण हक्काची सनद लावावी, त्या ठिकाणी सरकारी अधिकाऱ्याचे नाव व मोबाईल नंबर द्यावेत, अशी मागणी जगण्याच्या हक्काचे अभियान या संस्थेने मुख्यमंत्र्यांसह आरोग्यमंत्र्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनावर गौतम सोनवणे, प्रभाकर वायचळे, नाजीम काझी, शुभम कदम, संतोष जाधव आदींची नावे आहेत.
-------------------------------------------------------
साहित्य दुरुस्ती दुकाने सुरू ठेवा
मनमाड : पावसाळा तोंडावर येऊन ठेपला असून पावसाळ्यात करण्यात येणाऱ्या कामांसाठी लागणाऱ्या साहित्याची दुकाने सुरू ठेवण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. या दुकानांचा अत्यावश्यक सेवेत समावेश करण्याचीही सूचना करण्यात आलेली आहे. पावसाळ्यात छत्री दुरुस्त करणारी दुकाने, छतावर टाकण्यासाठी लागणारी प्लॅस्टिक शीट, ताडपत्री तसेच रेनकोट विक्रीची दुकाने सुरू ठेवल्यास नागरिकांची गैरसोय होणार नाही. शासनाने निर्बंध शिथिल करताना ही दुकाने सुरू ठेवण्याची मागणी होत आहे.
---------------------------------------------------------
इगतपुरी तालुक्यात बळीराजा शेतीकामात
इगतपुरी : यंदा पावसाचे वेळेवर आगमन होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला असल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या असून बळीराजा खरीप हंगामाच्या मशागतीत गुंतला आहे. भात लागवडीत आघाडीवर असलेल्या इगतपुरी तालुक्यात यंदा खरिपाचे ३२ हजार २३७ हेक्टर क्षेत्रावर लागवडीचे उद्दिष्ट आहे. तर २८ हजार क्षेत्रावर भाताची लागवड करण्यात येणार आहे. तालुक्याचे खरीप हंगामाचे सर्वसाधारण क्षेत्र २३ हजार ३३२ हेक्टर इतके असून मागील वर्षी २७ हजार ८३१ हेक्टर क्षेत्र उद्दिष्ट होते. यंदा खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी कृषी विभागही तयारीला लागला असून बांधावर शेतकऱ्यांना खतवाटप केले जाणार आहे.
----------------------------------------------
वारसांना मनपा सेवेत घेण्याची मागणी
मालेगाव : येथील महापालिका सेवेत कार्यरत असताना मयत झालेल्या ३० कामगारांच्या वारसांना अनुकंपा तत्त्वावर सेवेत सामावून घेण्याची मागणी महापालिका कामगार कर्मचारी संघटनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. सन २०१४ पासून ३० कामगारांच्या वारसांना नियुक्ती मिळावी यासाठी संबंधितांनी मनपा प्रशासनाकडे अर्ज केले आहेत. परंतु मनपा प्रशासनाने अद्याप त्यावर कोणतीही कार्यवाही केली नाही. त्यामुळे अनेक वर्षांपासून सदरचा प्रश्न प्रलंबित असल्याचे संघटनेने म्हटले आहे. प्रशासनाने यावर कार्यवाही करावी, अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष मनोहर अहिरे, संतोष ठाकरे, प्रताप वार, राजेश पटाईत, विकास यशोद यांनी केली आहे.
------------------------------------------------
दिव्यांग कल्याण निधीचे वाटप
नांदगाव : येथील नगरपरिषदेच्या हद्दीतील ८९ दिव्यांगांची नोंद करण्यात आली असून या दिव्यांगांना दिव्यांग कल्याण योजनेतून ३ लाख ५१ हजार रुपयांच्या मदतीचा धनादेश नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी निर्मला गायकवाड व नगराध्यक्ष राजेश कवडे यांच्या उपस्थितीत देण्यात आला. राज्य शासनाने दिव्यांगांना अर्थसाहाय्य म्हणून सदर योजना सुरू केली आहे. यावेळी प्रहार संघटनेचे शहराध्यक्ष राजू कटारे, गुलाब नवले, प्रतीक जाधव, विजय नंद, धन्नालाल पगारे, संतोष शिंदे, भुरा चौधरी आदी उपस्थित होते.
---------------------------------
अभोण्यातील नालेसफाईची मागणी
अभोणा : कळवण तालुक्यातील अभोणा येथे मुख्य नाल्यात मोठ्या प्रमाणावर घाण-कचरा साचला असून त्यामुळे पाणी तुंबून डासांचा उपद्रव वाढला आहे. अभोणा ग्रामपंचायतीने पावसाळ्यापूर्वी नाल्याची सफाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. अभोण्यातील सर्व गटारींमध्ये घाण-कचरा साचलेला आहे. या नाल्यांचे खोलीकरण करत गाळ काढण्यात यावा, तेथील झाडेझुडपे काढून नाल्याचा श्वास मोकळा करावा. पावसाळ्यात आणखी पाणी तुंबून साथीचे आजार वाढण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.
---------------------------------
मौजे पिंप्री येथे धान्य वाटप
कसबे-सुकेणे : मौजे पिप्री येथे पंतप्रधान ग्रामीण कल्याण योजनेंतर्गत अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना मोफत धान्यवाटप करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायतीच्या सरपंच सरपंच पद्मा अहेर, उपसरपंच निवृत्ती गायकवाड, सोसायटीचे चेअरमन शिवाजी आहेर, ग्रामपालिका सदस्य संगीता गांगुर्डे, सुरैया शेख, दशरथ भोई, रामभाऊ जाधव, दिनकर घोलप, महेश गायकवाड, शिवाजी सुर्भे, अनिल नळे आदी उपस्थित होते.
-------------------------------------------
वडगाव सिन्नरला लसीकरणाची मागणी
सिन्नर : तालुक्यातील वडगाव-सिन्नर येथे आठवड्यातून एकदा कोरोना प्रतिबंधक लसीकरण शिबिर घेण्याची मागणी सरपंच मंदाकिनी काळे, उपसरपंच नीलेश बलक, हर्षल काळे, सदस्य संदीप आढाव, ग्रामसेवक ज्ञानदेव ढोणे यांनी केली आहे. याबाबत तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ. मोहन बच्छाव यांच्याकडे मागणीचे निवेदन देण्यात आले आहे. वडगाव सिन्नर गावाचा समावेश पास्ते आरोग्य उपकेंद्रांतर्गत होतो. मात्र दोन्ही गावात मोठे अंतर असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होताना दिसून येत आहे.
-------------------------------------
आदिवासी पाड्यावर किराणा वाटप
वैतरणा डॅम : कोरोनाकाळात रोजगार गेल्याने परिस्थिती बिकट बनलेल्या आदिवासी कुटुंबांना मुंबई येथील प्रभुनयन फाऊंडेशनने मदतीचा हात दिला आहे. फाऊंडेशनच्यावतीने वैतरणा परिसरातील वाड्या-वस्त्यांवर आदिवासी कातकरी कुटुंबीयांना मोफत किराणा व भाजीपाल्याचे वाटप करण्यात आले. यावेळी फाऊंडेशनचे अध्यक्ष आनंद मवाणी, तहसीलदार परमेश्वर कासुळे, दीपा मवाणी, विजय गडाळे, रामभाऊ चौधरी, राजेश देवळेकर, विनोद डावखर आदी उपस्थित होते.