नाशिक : गंगापूररोडवरील एका बंगल्याच्या उघड्या दरवाजामधून प्रवेश करत स्वयंपाकघरात ठेवलेले पाच लाख रुपये किमतीचे सोन्याची १० तोळ्यांची बिस्किटे चोरून पोबारा करणाऱ्या चोरट्याला गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकाने हनुमानवाडी लिंकरोडवरील मोरे मळ्यात सापळा रचून बेड्या ठोकल्या. त्याने सराफ बाजारात विक्री केलेले बिस्किटे पोलिसांनी पुन्हा हस्तगत केले आहे.
गंगापूररोडवरील सुरभी राहुल देशमुख (३७, रा. मधुर रेसिडेन्सी) यांच्या घराचा दरवाजा उघडा असल्याचा गैरफायदा घेत अज्ञात चोरट्याने रविवारी (दि.२२) दहा वाजता १० तोळ्याचे सोन्याची बिस्किटे घेऊन पोबारा केला होता. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास करण्याचे आदेश गुन्हे शाखेचे उपायुक्त संग्रामसिंह निशाणदार यांनी गुन्हे शाखा युनिट-१ला दिले होते. वरिष्ठ पोलीस निरिक्षक आनंदा वाघ यांनी याबाबत तपासचक्रे फिरविली. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सहायक निरीक्षक महेश कुलकर्णी, उपनिरिक्षक निवृत्ती सरोदे, सहायक उपनिरिक्षक विजय गवांदे, रवींद्र बागुल आदींच्या पथकाने मोरे मळा परिसरात सापळा रचला. यावेळी एक संशयित युवक पोलिसांचे वाहन ओळखून पळूु लागला. पोलिसांनीपाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. त्याची विचारपूस केली असता त्याने निवृत्ती भीमराव बुरुंगे (३०, रा. गवारे मळा, हनुमानवाडी) असे स्वत:चे नाव सांगितले. त्याला पोलीस खाक्या दाखविला असता निवृत्ती याने सोन्याचे बिस्किटे चोरी केल्याची कबुली दिली. त्यास पथकाने गुन्हे शाखेच्या कार्यालयात आणून झाडाझडती घेतली असता त्याने त्याचा मित्र दत्तू गोसावीच्या ओळखीने सराफ बाजारातील एका सराफाकडे कारागीर असलेल्या व्यक्तीच्या मध्यस्थीने साेने विक्री केल्याचे सांगितले. पोलिसांनी याप्रकरणी गोसावीची चौकशी केली असता गुन्ह्यात त्याचा प्रत्यक्ष सहभाग दिसून आला नसल्याचे वाघ यांनी सांगितले. याप्रकरणी पुढील तपास गंगापूर पोलीस करीत आहेत.
--इन्फो--
मोडीच्या भावात विकली सोन्याचे बिस्किटे
‘मला पैशांची खूप गरज आहे, तुम्हाला मी नंतर या बिस्किटाची खरेदी पावती आणून देतो..,’ असे सांगून सोन्याची १००ग्रॅम वजनाची बिस्कीटे मोडीच्या भावात निवृत्ती याने विक्री केल्याची माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे. पोलिसांनी सराफ बाजार गाठून संबंधित सराफाकडून हे सोने ताब्यात घेतले. संशयित आरोपी निवृत्ती यास मुद्देमालासह पुढील तपासाकरिता गंगापूर पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे.