नाशिकरोड : ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढल्या वर्षी लवकर या’ असा जयघोष व गुलालाची उधळण करत ढोल-ताशांच्या गजरात लाडक्या श्री गणरायाचे नाशिकरोड परिसरात ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात विसर्जन करण्यात आले. मुख्य मिरवणुकीमध्ये एकमेव नाशिकरोड-देवळाली व्यापारी बॅँक कर्मचारी गणेश उत्सव मंडळाचा चित्ररथ सहभागी झाला होता.गेल्या ११ दिवसांपासून घराघरांत व सार्वजनिक मंडळांनी स्थापन केलेल्या लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी गुरुवारी सकाळपासून सर्वत्र तयारी सुरू होती. सकाळी पावसाची रिपरिप सुरू असल्याने भाविक विसर्जनासाठी कमी प्रमाणात येत होते. देवळालीगाव, विहितगाव वडनेर, वालदेवी तीरावर, चेहेडी दारणा नदी व जेलरोड गोदावरी नदीकिनारी घरगुती श्री गणरायाचे भक्तिपूर्ण वातावरणात विसर्जन करण्यासाठी दुपारनंतर भाविकांची मोठी गर्दी झाल्याने संपूर्ण परिसर गर्दीने फुलून गेला होता. जेलरोड दसक येथे भाविक मोठ्या संख्येने श्री विसर्जनासाठी येत असल्याने दुपारनंतर जेलरोड परिसर गर्दीने फुलून गेला होता. तसेच मनपाने स्थापन केलेल्या पाच ठिकाणी कृत्रिम तलावावर भाविकांनी नदीच्या प्रदूषणाला आळा घालत मोठ्या प्रमाणात श्री गणरायाचे विसर्जन केले. कृत्रिम तलाव व नदी पात्रावर मनपा प्रशासन, सामाजिक संघटना व विविध संस्थांच्या वतीने नदीचे प्रदूषण थांबविण्यासाठी मूर्ती दान करण्याचे सांगण्यात येत होते.विशेष म्हणजे सोसायटी-कॉलनीतील छोट्या मंडळांनी काढलेल्या मिरवणुकीमध्ये तेथील सर्वधर्मीय रहिवासी, महिला सहभागी झाल्या होत्या. लहान बालगोपाळांमध्ये विसर्जनाचा मोठ्या उत्साह होता. दत्तमंदिररोड मनपा शाळा क्रमांक १२५ मैदान, जयभवानीरोड निसर्गोपचार केंद्रासमोरील मैदान, शिखरेवाडी मैदान, चेहेडी ट्रक टर्मिनस, जेलरोड नारायण बापूनगर या पाच ठिकाणी मनपा प्रशासनाच्या वतीने उभारण्यात आलेल्या कृत्रिम तलावात भाविकांनी श्री विसर्जनासाठी गर्दी केली होती. विसर्जनस्थळी सर्वत्र अग्निशामक दलाचे जवान, जलतरण तलावावरील जलतरणपटू तैनात करण्यात आले होते.नाशिकरोड परिसरात १७ हजार ६६५ मूर्तींचे दाननदीचे प्रदूषण रोखण्यासाठी व पर्यावरणाच्या हिताच्या दृष्टीने श्री गणरायाची मूर्ती दान करण्याचे प्रमाण यंदाच्या वर्षी नाशिकरोड परिसरात वाढले आहे. देवळालीगाव वालदेवी नदी- १९९२, विहितगाव वालदेवी नदी- १४२०, वडनेर गेट वालदेवी नदी- २०३५, जेलरोड दसक गोदावरी नदी-२८३२, चेहेडीगाव दारणा नदी-२४६५, दत्तमंदिररोड मनपा शाळा १२५ मैदान कृत्रिम तलाव- १२८५, शिखरेवाडी मैदान ११७५, जयभवानीरोड निसर्गोपचार केंद्र- १२६९, जेलरोड नारायणबापूनगर- १९३५, चेहेडी ट्रक टर्मिनस-१२५७ अशा एकूण भाविकांनी १७ हजार ६६५ मूर्ती दान केल्यात. नदी पात्रात मूर्ती विसर्जित करण्यापेक्षा कृत्रिम तलावात मूर्ती बुडवून दान करण्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच अनेक भाविकांनी घरातच बादली, पिंप, टपामध्ये मूर्ती विसर्जित केली. घरीच मूर्ती विसर्जित करण्यासाठी मनपाकडून ११७ भाविकांना ३२५ किलो अमोनियम बाय कार्बोनेट वितरीत करण्यात आले.मुख्य मिरवणूकनाशिकरोडच्या मुख्य मिरवणुकीत एकमेव नाशिकरोड-देवळाली व्यापारी बॅँक कर्मचारी गणेशोत्सव मंडळाचा चित्ररथ सहभागी झाला होता. मिरवणुकीतील आदिवासीबांधवांचे नृत्य आकर्षण ठरले होते. आयएसपी-सीएनपी वेल्फेअर फंड कमिटी, बालाजी सोशल फाउंडेशन, ईगल स्पोर्टस् क्लब, मातोश्री फ्रेंडसर्कल, अनुराधा फ्रेंडसर्कल, साईराज मित्रमंडळ आदी मंडळांनी परिसरातून मिरवणूक काढून विसर्जन केले.
गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2019 12:38 AM