गणेश चौक महापालिका शाळा की धर्मशाळा

By Admin | Published: December 10, 2015 12:15 AM2015-12-10T00:15:11+5:302015-12-10T00:16:36+5:30

शिक्षण मंडळाचे दुर्लक्ष : विद्यार्थ्यांची संख्या रोडावली, शिक्षकांचे ‘आवो जावो घर तुम्हारा’

Ganesh Chowk Municipal School's Dharmashala | गणेश चौक महापालिका शाळा की धर्मशाळा

गणेश चौक महापालिका शाळा की धर्मशाळा

googlenewsNext

नरेंद्र दंडगव्हाळ,सिडको
येथील महापालिकेच्या गणेश चौक हायस्कूलमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असून, दररोज बोटावर मोजण्याइतपत विद्यार्थी शाळेत येत आहेत. विशेष म्हणजे शिक्षकही शाळेत वेळेवर येत नसल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे.
सिडकोतील गणेश चौक हायस्कूल पूर्वी जुन्या इमारतीत होते. आता शाळेला नवीन इमारत मिळाली असली तरी येथील शिक्षकांची मानसिकता बदलेली दिसत नाही. या शाळेतील विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत आलेले आहेत. मात्र ही गुणवत्ता टिकविण्यात शिक्षकांना अपयश आल्याची टीका पालकवर्गाकडून होत आहे. मुख्याध्यापकांबरोबर समन्वय राखत शिक्षक मनमानी पद्धतीने शाळेत येत असल्याचे पालकांचे म्हणणे आहे.
खरे तर या शाळेला नवीन इमारत लाभल्यानंतर शाळेचा विकास होणे अपेक्षित होते. मात्र दुर्दैवाने तसा कोणताही उत्साह शिक्षकांमध्ये दिसत नसल्याचे चित्र आहे. दुपारच्या सत्रात इयत्ता पाचवीपासून ते दहावीपर्यंत वर्ग भरतात. परंतु प्रत्येक वर्गात काही मोजकेच विद्यार्थी असतात. अनेकदा तर दोन वर्ग मिळून विद्यार्थी एकत्र बसविले जातात. शिक्षकांना वाटले तर ते वर्गावर जातात. शाळेतील विद्यार्थी संख्या कमी असतानाही याकडे कोणीही गांभीर्याने घेत नसल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.
या एकूणच प्रकारामुळे शाळेची अवस्था एखाद्या धर्मशाळेसारखी झाली आहे. वर्गातील बहुतांशी बाके खराब झालेली आहेत. खिडक्यांची मोडतोड झालेली असून, आवारात संपूर्ण गाजर गवत वाढलेले आहे. ठिकठिकाणी कचरा साचलेला असून, सर्वत्र अस्वच्छतेमुळे धुळीचे वातावरण पसरलेले आहे. शाळेच्या वरच्या मजल्यावरही स्वच्छता नसल्याने मोठ्या प्रमाणात धूळ साचलेली आहे.शाळेच्या आवारात एका मनपा कर्मचाऱ्यासाठी खोली देण्यात आलेली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या ठिकाणी कर्मचारी राहत असून, सुरुवातीस एका खोलीत राहणाऱ्या या कर्मचाऱ्याने अन्य खोल्यांवरही ताबा मिळविला आहे. विशेष म्हणजे हा कर्मचारी या शाळेतील कर्मचारीदेखील नाही.


प्रयोगशाळा बंद
शालेय विद्यार्थ्यांना विशेष करून इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना प्रयोगशाळेचा तास असतो; परंतु येथील प्रयोगशाळा अक्षरश: एका कपाटात गुंडाळून ठेवली असून, गेले अनेक दिवस या प्रयोगशाळेत विद्यार्थ्यांना शिकविले की नाही असेच चित्र बघावयास मिळाले. प्रयोगशाळेतील साहित्य एका कपाटात बंद करून ठेवण्यात आले आहे. त्याच वापर केला जात नसल्याचे दिसते.

संगणकीय कक्षात नादुरुस्त संगणक

विद्यार्थ्यांच्या कलागुणात भर पडावी, तसेच त्यांना संगणकाची ओळख व्हावी यासाठी प्रत्येक शाळेत शासनाने संगणक दिले आहेत. परंतु या शाळेतील संगणक कक्ष धूळ खात पडून आहे. या ठिकाणी असलेल्या बोटावर मोजण्या इतक्या संगणकांपैकी संगणक चालू स्थिती नाही. यामुळे याठिकाणी विद्यार्थ्यांना संगणकाचे धडे मिळणार तरी कसे, अशीच परिस्थिती येथील ग्रंथालयाचीदेखील आहे.
मद्यपींचाही त्रास; आयुक्तांनी लक्ष देण्याची गरज
शाळेला कोणतीही सुरक्षा व्यवस्था नसल्याने शाळेचे मैदान हे रात्रीच्या वेळी टवाळखोरांचा अड्डा बनला आहे. तसेच रात्रीच्या वेळी याठिकाणी मद्यपी धिंगाणा घालत असल्याने परिसरातील सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहे. शाळेचे मुख्य गेट तुटलेले असून, परिसराला बकाल स्वरूप प्राप्त झाले आहे. शाळेतील या सर्व प्रकाराबाबत मनपा आयुक्तांनीच लक्ष घालण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

Web Title: Ganesh Chowk Municipal School's Dharmashala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.