नाशिक : कालिदास कलामंदिरासमोर पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्यासाठी संबंधित आठ ते नऊ मंडळांना परवानगी द्यावी यासाठी महापौर रंजना भानसी आग्रही असून, त्यांनी याबाबत आयुक्तांना प्रारंभिक स्तरावर पत्र देण्याचा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे विरोधी पक्षांनीदेखील यावर टीका केली असून, शिवसेनेने भाजपावर टीका करताना यांच्या कारकिर्दीत गणपती हद्दपार होत असल्याची टीका केली आहे. शहरातील महिंद्रा, बॉशसह अनेक कंपन्या दरवर्षी महापालिकेच्या बी. डी. भालेकर मैदानात गणेशोत्सव साजरा करीत असतात. सध्या याठिकाणी स्मार्ट पार्किंगचे काम सुरू असून, महापालिकेने सदरचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे या मागणीसाठी सुमारे सात ते आठ विविध मंडळांचे पदाधिकारी आयुक्तांना भेटण्यासाठी गेले असता आयुक्तांनी संबंधितांना वाहनतळाच्या जागेत गणेशोत्सव देखावे सादर करण्यास नकार दिला. शिवाय दुरुत्तरे केल्याचा संबंधित पदाधिकाऱ्यांचा आरोप आहे. त्यावरून सदरच्या मंडळ पदाधिकाºयांनी बुधवारी (दि. २५) महापौर रंजना भानसी यांच्यासह विविध पदाधिकाºयांच्या भेटी घेतल्या. दरम्यान, महापौर रंजना भानसी यांनीदेखील मंडळांच्या बाजूची भूमिका स्पष्ट केली. वर्षांनुवर्षे त्याठिकाणी गणेशोत्सव साजरा केला जातो आणि आता त्याच ठिकाणी संबंधित मंडळांना परवानगी द्यावी अशी भूमिका मांडतानाच आयुक्त तुकाराम मुंढे यांना पत्र देणार असल्याचे त्यांनी सांगितले.दरम्यान, यासंदर्भात विरोधी पक्ष नेते अजय बोरस्ते यांनी सत्तारूढ भाजपावरच कोरडे ओढले असून, सत्ताधिकारी आणि प्रशासनाचे डोके ठिकाणावर आहे काय? असा प्रश्न केला आहे. गणेशोत्सव सुरू करणाºया लोकमान्य टिळकांचा वारसा सांगणाºया भाजपाच्या सत्ता कालावधीत गणरायालाच शहराबाहेर हद्दपार केले जात आहे. दरवर्षीप्रमाणेच संबंधित मंडळांना त्याठिकाणी जागा द्यावी अन्यथा शिवसेना स्टाइल उत्तर देण्याचा इशारादेखील बोरस्ते यांनी दिला आहे.तर रस्त्यावरच गणेश प्रतिष्ठापनामनसे गटनेता सलीम शेख यांनी महापालिका प्रशासनाने आडमुठेपणाची भूमिका घेतल्यास रस्त्यावरच गणेश प्रतिष्ठापना करण्याचा इशारा दिला आहे. सामाजिक सलोखा जपण्यासाठी गणेशोत्सव महत्त्वाचा असून, भालेकर मैदानावर दरवर्षीच प्रतिष्ठापना होत असते. त्यात जागेची काही अडचण असेल तर त्याला पर्याय दिला पाहिजे. मुंबई, पुण्यात तर रस्त्यावर मंडप टाकून उत्सव साजरा केला जातो. येथे तर कोणालाही त्रास होणार नाही अशी जागा मागितली आहे. सदरची जागा न दिल्यास मनसे मुख्य रस्त्यावर मंडप टाकून गणरायाची प्रतिष्ठापना करेल व कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी प्रशासनाची असेल, असे त्यांनी पत्रकात म्हटले आहे.तर बहिष्काराचा गणपती..राष्टÑवादी कॉँग्रेस पक्षाच्या वतीने गटनेते गजानन शेलार यांनी गणेशोत्सवासाठी भालेकर मैदानावर जागा देण्यास मनाई करण्याच्या निर्णयाच्या विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली असून, गणेश मंडळांना अशाप्रकारे अडथळे आणल्यास बहिष्काराचा गणपती बसवू असा इशारा दिला आहे.
गणेशोत्सव ‘भालेकर’वरच व्हावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 11:56 PM