गंगापूर धरण समूहात ९३ टक्के साठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2019 02:10 AM2019-08-12T02:10:34+5:302019-08-12T02:11:06+5:30
नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरण समूहातील पाणीसाठा ९३ टक्क्यांपर्यंत पोहोचला असून, मागील वर्षीच्या तुलनेत साठ्यात दहा टक्के इतकी अधिकची वाढ आहे.
नाशिक : नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरण समूहातील पाणीसाठा ९३ टक्क्यांपर्यंत पोहोचला असून, मागील वर्षीच्या तुलनेत साठ्यात दहा टक्के इतकी अधिकची वाढ आहे.
समूहातील चारही धरणांमध्ये ९० टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा असल्याने आळंदी वगळता उर्वरित तीनही धरणांमधून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. दरम्यान, गंगापूर धरणातील विसर्गात घट करण्यात आल्यामुळे गोदावरी नदीचा पूर मोठ्या प्रमाणावर ओसरण्यास मदत झाली आहे.
जिल्ह्णात इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर हे पावसाचे तालुके म्हणून ओळखले जातात. त्र्यंबकेश्वर समूहात गेल्या पंधरा दिवसांपासून मोठा पाऊस झाल्याने धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होण्यास मदत झाली. पावसाचा जोर सातत्याने वाढत असल्यामुळे धरणातून विक्रमी ४५ हजार क्यूसेकपेक्षा अधिक पाण्याचा विसर्ग करावा लागला होता. पावसाचा जोर कमी झाल्याने आता हा विसर्ग कमी-कमी करण्यात आला असून, रविवारी सकाळी ६१६० इतक्या वेगाने विसर्ग केला जात होता. सायंकाळी सहा वाजेनंतर विसर्ग ११३७ क्यूसेक करण्यात आला.
गंगापूर धरण समूहातील गंगापूर धरणात रविवारी ८९, कश्यपी धरणात ९७, गौतमी गोदावरी ९४ आणि आळंदी धरणातील पाणीसाठा १०० टक्के इतका आहे. सायंकाळी सहा वाजेनंतर या तीनही धरणांमधून विसर्ग कमी करण्यात आला. कश्यपीमधून ४२२, गौतमी गोदावरीमधून १२० तर आळंदीमधून ६८७ क्यूसेक इतका विसर्ग करण्यात आला. विसर्ग कमी करण्यात आल्यामुळे गोदावरी नदीची पातळी कमी झाली आहे.
—इन्फो—