गुजरात राज्यातील मालेगावी गुटखा विक्रीसाठी येत असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक निलोत्पल यांना मिळाली होती. त्यानुसार विशेष पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वांगडे, पोलीस हवालदार शरद देवरे, देविदास ठोके, अभिमन्यू भिलावे, महारू माळी, किरण दासरवाल आदिंच्या पथकाने येथील कॅम्प भागात मंगळवारी सकाळी नामपूर रोडवरील चर्चगेटजवळ नाकाबंदी केली होती. या नाकाबंदीत वाहन तपासणी करताना पिकअप क्रमांक एमएच ४१ एजे २५२६ हिच्यात नारळाच्या पोत्याच्या आड ११ लाख ८८ हजार रूपये किंमतीचे ६ हजार नग गुटख्याच्या थैल्या तसेच एक लाख ३२ हजार रूपये किंमतीचे ६ हजार नग तंबाखूच्या पिशव्या असल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी चालक इरफानअली सय्यद रा. आयेशानगर व क्लिनर मोबीन शेख अंजूम (२४) रा. नूरबाग या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांना सदर गुटख्याच्या मालकाबद्दल विचारले असता गुटखा शरीफ कच्छी याचा असल्याची कबुली दिली आहे. दरम्यान, अन्न सुरक्षा अधिकारी के. एच. बाविस्कर यांच्या ताब्यात गुटख्याचा साठा देण्यात आला आहे. तसेच दोघा संशयितांसह गुटखा मालकावर खटला दाखल करण्याची कार्यवाही अन्न व सुरक्षा अधिकारी करणार आहेत. गेल्या ५ जानेवारी रोजी नामपूर येथील बसस्थानकाजवळही पिकअप क्रमांक एमएच ४१ - १०५८ मध्ये १६ लाख ७० हजार रूपयांचा गुटखा मिळून आला होता. अवघ्या महिनाभरात पोलिसांनी ३५ लाख २० हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी दिली.
मालेगावी १३ लाख २० हजारांचा गुटखा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 4:56 PM